Prathamesh Laghate Birthday : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे ही मराठी संगीतविश्वातील सगळ्यांची लाडकी जोडी. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वापासून मुग्धा-प्रथमेश आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहेत. दोघांचे महाराष्ट्रासह जगभरात अनेक संगीत कार्यक्रम होत असतात. त्यांच्या कार्यक्रमांना श्रोत्यांचीही हाउसफुल्ल गर्दी होते. याशिवाय हे दोघंही सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असतात. मुग्धाने पती प्रथमेश लघाटेच्या वाढदिवसानिमित्त नुकतीच सोशल मीडियावर रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

मुग्धा वैशंपायनने प्रथमेश लघाटेच्या वाढदिवसानिमित्त दोघांचे एकूण १७ फोटो शेअर केले आहेत. गणेशोत्सवातील, गाण्यांच्या कार्यक्रमातील, एअरपोर्टवरच्या गोड फोटोंचा यामध्ये समावेश आहे.

Prathamesh Laghate Birthday mugdha
मुग्धा-प्रथमेश

मुग्धा वैशंपायन लिहिते, “माझ्या सगळ्यात जवळच्या आणि आवडीच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! माझं जग तू आनंदी बनवलंस, त्यासाठी तुझे मनापासून आभार. तू आपल्या घराचा भक्कम आधारस्तंभ आहेस. तू आपल्या घराला खऱ्या अर्थाने ‘घर’पण दिलंस. तुला खूप-खूप प्रेम! लव्ह यू Moon and Back!”

मुग्धाने शेअर केलेल्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “क्युट फोटोज”, “प्रथमेश तुला खूप खूप शुभेच्छा”, “नांदा सौख्य भरे किती गोड फोटो आहेत”, “कलाविश्वातील सर्वात आवडती जोडी”, “आमचा मोदक…तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा”, “दोघेही असेच कायम आनंदी राहा”, “दोघंही गोडुले” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी या फोटोंवर दिल्या आहेत.

दरम्यान, २१ डिसेंबर २०२३ रोजी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लग्नबंधनात अडकले होते. त्यांचा विवाहसोहळा कोकणात पारंपरिक पद्धतीने पार पडला होता. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्येच मुग्धा आणि प्रथमेशची ओळख झाली. त्यानंतर काही वर्षांनी दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा व प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. याचदरम्यान त्यांच्यात छान मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता येत्या डिसेंबर महिन्यात या दोघांच्या लग्नाला ३ वर्षे पूर्ण होतील.