Mugdha Vaishampayan & Prathamesh Laghate : गणपतीचा सण म्हणजे समस्त कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय. गौरी-गणपतीच्या सणासाठी मुंबईकर चाकरमानी खास ऑफिसमधून सुट्ट्या घेऊन, कामातून वेळ काढून आवर्जून गावी जातात. भजन, आरती, पारंपरिक पद्धतीने बाप्पाचं आगमन या सगळ्या प्रथा-परंपरा आजही कोकणातील लोकांनी जपल्या आहेत. प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायनने तिच्या सासरच्या अन् माहेरच्या गणेशोत्सवाची झलक नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दाखवली आहे.
मुग्धा वैशंपायनचं माहेर अलिबागमधील खानाव येथे आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे बाबा, आई अन् ताई बाप्पाची मनोभावे प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळतंय.

तर, गायिकेने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोत तिच्या सासरच्या बाप्पाची झलक पाहायला मिळतेय. मुग्धाचं सासर रत्नागिरी जिल्ह्यात आरवली येथे आहे. हरतालिका पूजन, बाप्पाचा नैवेद्य, गावचं भजन याची झलक मुग्धाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय. याशिवाय मुग्धाने एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

मुग्धाने या व्हिडीओमध्ये लघाटे बंधूंच्या मूर्तीशाळेची झलक चाहत्यांना दाखवली आहे. कॅप्शनमध्ये ती लिहिते, “आमच्याच मूर्ती शाळेपासून ते घरच्या देव्हाऱ्यापर्यंत…बाप्पाचा प्रवास आणि आमचा आनंद! कोकणातला तो जल्लोष, ती गर्दी आणि बाप्पाची भक्ती अनुभवण्यासाठी रील शेवटपर्यंत नक्की बघा”
मुग्धाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मस्तच याला म्हणतात खरा सण”, “कोकणातील गणेशोत्सव खरंच भारी असतो”, “साधेपणात खरं सुख आहे”, “खूपच रेखीव आणि सुंदर गणपती बाप्पा.. साधेपणातील सौंदर्य म्हणजे लघाटे कुटुंब” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त मुग्धाचं ‘चिंतामणी आज देखिला’ हे सुंदर गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. बाप्पाच्या आगमनाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मुग्धाने ही सांगीतिक भेट चाहत्यांना दिली आहे.
