‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन घराघरांत लोकप्रिय झाली. शो संपल्यावर पुढे अनेक वर्षांनी खऱ्या आयुष्यात मुग्धा-प्रथमेशचे सूर जुळले आणि डिसेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांची ही लाडकी जोडी एकत्र आली. मुग्धा आणि प्रथमेश दोघंही गाण्यांच्या कार्यक्रमानिमित्त विविध ठिकाणी भेट देत असतात. कधी त्यांचे कार्यक्रम गोव्यात असतात तर, कधी मुग्धा अंदमान दौऱ्यावर असते. पण, कामातून वेळ मिळाल्यावर हे दोघंही आवर्जून कोकणात जातात.

मुग्धाचं सासर रत्नागिरीमध्ये आरवली गावात आहे. लग्नानंतर या जोडप्याचं प्रथमेशच्या घरी जंगी स्वागत करण्यात आलं होतं. गणेशोत्सव, होळी आणि व्यग्र शेड्यूलमधून वेळ मिळाल्यावर मुग्धा सासरी कोकणात जाते. नुकतीच मुग्धाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तिच्या सासरच्या घराची झलक सर्वांना दाखवली आहे.

‘कोकण म्हणजे स्वर्ग!’ असं बोललं जातं आणि कोकणाला स्वर्ग का म्हणतात याची प्रचिती प्रेक्षकांना मुग्धाने शेअर केलेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. निसर्गरम्य परिसर, सर्वत्र हिरवीगार झाडं, शेणाने सारवलेली जमीन, ओले काजूगर, कोकणी मेवा, खळ्यात ( अंगणात ) झाडाला बांधलेला सुंदर झोपाळा, कौलारू घर, गुरांचा गोठा, चिऱ्याच्या भिंती, एकत्र पोपटी ( पदार्थ ) बनवणं आणि दर गुरुवारी न चुकता गुरुमाऊलींची भजनसेवा करणं या सगळ्याची झलक मुग्धाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

मुग्धाने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहूनच मन प्रसन्न होतं. कोकणातील सौंदर्य, एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र येऊन सणवार साजरं करणं याची झलक गायिकेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. मुग्धा लिहिते, “Vitamin : Kokan….कोकणात राहायला मिळणं याहून मोठं भाग्य ते काय असेल…जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली”

मुग्धाने शेअर केलेल्या व्हिडीओवर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मुग्धा ताई गाणं अगदी सुंदर लावलं आहेस”, “आरवली गाव…सुंदर मुग्धा”, “आपलं कोकण म्हणजे स्वर्गाहून सुंदर”, “कोकणात जन्म घेणं…यासाठी भाग्य लागतं”, “सुंदर व्हिडीओ”, “आपल्या संस्कृतीची झलक यानिमित्ताने पाहायला मिळाली” अशा असंख्य प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.