Mukta Barve on Vanita Kharat: मुक्ता बर्वेने तिच्या अनेकविध भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. जोगवा, आम्ही, मुंबई पुणे मुंबई, एका लग्नाची दुसरी गोष्ट, हृदयानंतर, आम्ही दोघी, डबल सीट, नाच गं घुमा, लग्न पाहावे करून अशा अनेक सिनेमांत अभिनेत्रीने विविध भूमिका साकारल्या आहेत.
अभिनेत्री आता लवकरच एका नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाची ती निर्माती असणार आहे. तिच्या सख्ख्या मोठ्या भावाने हे नाटक लिहिले आहे. मीरा वेलणकर या नाटकाचे दिग्दर्शन करणार आहेत. मुक्ता या नाटकाची निर्माती असण्याबरोबरच त्यामध्ये ती कामही करणार असल्याचा खुलासा मुक्ताने अमोल परचुरेंना दिलेल्या मुलाखतीत केला.
“मला हृता दुर्गुळेचं काम सर्वांत जास्त…”
याच मुलाखतीत मुक्ताने आताच्या पिढीतल्या कोणत्या कलाकारांची कामे आवडतात, यावरही वक्तव्य केले. काही कलाकारांची नावे घेत तिने त्यांचे काम आवडत असल्याचे सांगितले. ती म्हणाली, “मला हृता दुर्गुळेचं काम सर्वांत जास्त आवडतं. तिच्यात वेगळी सहजता आहे. विशेषत: सिनेमाच्या माध्यमात ती सहजता लागते, ती तिच्यात आहे. मला ललित प्रभाकर आवडतो. नम्रता संभेरावनं बरंच काम केलं आहे. तिचं काम मला आवडतं.”
पुढे ती म्हणाली, “महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील खरं तर सगळेच कलाकार फार चांगलं काम करतात. वनिता खरातचं काम मला खूप आवडतं; जी गुणवत्ता मला निर्मितीताई व संदीप पाठक यांच्यामध्ये दिसते आणि सतीश तारेसरांमध्ये दिसायची. विनोद करता करता अचानक त्या विनोदी भूमिकेतील गंभीर बाजू दाखवणं हे खूप अवघड असतं.”
मुक्ता असेही म्हणाली, “या कलाकारांपेक्षा नवीन कलाकारांबद्दल बोलायचं, तर ‘एप्रिल मे ९९’मधील सगळी मुलं. त्यातील एकाबरोबर तर मी कामही केलं आहे. एक शॉर्ट फिल्म केली. १७ वं वर्ष असं त्याचं नाव आहे. तो अप्रतिम सहकलाकार आहे. श्रेयस थोरात असं या अभिनेत्याचं नाव आहे. साजिरी जोशीला मी एकांकिकेत बघितलंय. तिची वेब सीरिज, फिल्मही बघितली आहे. तिला माध्यमाची खूप छान जाण आहे. तिची कामं बघताना छान वाटतं.
तिची कामं बघताना, तसेच या मुलांबरोबर काम करताना खूप बरं वाटतं.
दरम्यान, मुक्ता बर्वेचा मोठा चाहतावर्ग आहे. नाटकाबरोबरच मुक्ता आणखी कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
