Marathi Actress on Mulund Bridge Incident : १४ फेब्रुवारी २०२६, शनिवार रोजी मुलुंड (पश्चिम) भागात मोठी दुर्घटना घडली. मेट्रो लाइन ४ (ग्रीन लाइन) च्या बांधकामादरम्यान उंचावरील पॅरापेट (काँक्रीटचा भाग) कोसळला. हा भाग एका चार चाकी वाहनावर आणि रिक्षावर कोसळला. त्यामुळे एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकचे काम हाती घेतले आहे. या कामादरम्यान मुलुंड येथील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीसमोरील एल.बी.एस. रोडवर शनिवारी दुपारी १२.२० च्या सुमारास मेट्रोच्या खांबाचा काँक्रीट स्लॅब कोसळला. रस्त्यावरून जात असलेली रिक्षा आणि कारवर हा भाग कोसळल्याने तिघे जण जखमी झाले, तर एकाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर आता सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवर अनेकजण आपापली मतं व्यक्त करीत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवनेसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर तिचा संताप व्यक्त केला आहे.

मुलुंडमधील मेट्रो ब्रिज दुर्घटनेवर रुचिरा जाधवची संतप्त प्रतिक्रिया

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये रुचिरा म्हणते, “मुलुंडची रहिवासी म्हणून, कालच्या मेट्रो पुल दुर्घटनेने मी हादरून गेली आहे. मी जवळपास रोजच त्या रस्त्यावरून प्रवास करते. माझ्यासारख्या बऱ्याच लोकांसाठी, हा रस्ता रोजच्या प्रवासाचा भाग आहे. ही घटना नागरिकांची सुरक्षा, त्यांची जबाबदारी आणि व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वसामान्यांच्या आयुष्याशी संबंधित आहे.”

यानंतर तिनं म्हटलं, “या प्रकरणातल्या जबाबदार लोकांविरुद्ध कठोर कारवाई झालीच पाहिजे. तसंच नागरिक म्हणून याप्रकरणी पारदर्शक चौकशीची मागणीसुद्धा मी करते. माणसांचे जीव धोक्यात घालून पायाभूत सुविधा करता येऊ शकत नाहीत. आम्ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडतो. या बदल्यात, आम्हाला सुरक्षित रस्ते, तसंच जबाबदार प्रशासनाची अपेक्षा आहे. जर प्रगती अशी असणार असेल, तर थांबवा.” तसंच पोस्टच्या कॅप्शनद्वारे तिने “आम्ही यासाठीच टॅक्स भरतो का?” असा संतप्त सवालही तिनं विचारलं आहे.

मुलुंडमधील मेट्रो ब्रिज दुर्घटनेवर रुचिरा जाधवची संतप्त पोस्ट

दरम्यान, अभिनेत्रीच्या या पोस्टखालील कमेंटमध्ये अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. “तू निदान पोस्टद्वारे यावर तुझं मत व्यक्त केलंयस”, “अशा प्रकरणावर बोलायलासुद्धा आता हिंमत लागते ती तू केलीस”, या आणि अशा अनेक कमेंट्समधून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.