Yatin Karyekar on Divorce and Alcoholism: लोकप्रिय मराठी व हिंदी अभिनेते यतिन कार्येकर यांनी टीव्ही मालिकांसह बॉलीवूड चित्रपटही केले आहेत. राजकुमार हिरानी यांच्या ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस.’ या चित्रपटात त्यांनी ‘आनंद बॅनर्जी’ नावाची भूमिका केली होती. यतिन यांनी आपल्या दारूच्या व्यसनाबद्दल आणि नैराश्याच्या काळाबद्दल भाष्य केलंय. घटस्फोटानंतर ते व्यसनाच्या आहारी गेले होते, असा खुलासाही त्यांनी केला.
सिद्धार्थ कन्नन यांच्याशी बोलताना यतिन कार्येकर यांनी त्यांचं रिलेशनशिप, लग्न व घटस्फोट या सगळ्यांबद्दल भाष्य केलं. हा आयुष्यातील अत्यंत त्रासदायक काळ होता. आता एक्स पत्नीबरोबर कोणताही संपर्क नसल्याचं यतिन यांनी स्पष्ट केलं. “ती माझ्यापासून दूर झाली. मी शूटिंगमध्ये व्यग्र असायचो आणि तिला एकटेपणा जाणवू लागला. लग्नानंतर तिने काम करणं सोडून दिलं होतं आणि त्यानंतर ती निघून गेली,” असं यतिन कार्येकर यांनी सांगितलं.
यतिन कार्येकर यांचं लग्न व घटस्फोट
यतिन यांनी आपल्या एक्स पत्नीचा आदर राखत घटस्फोटाबद्दल जास्त बोलणं टाळलं. त्यांनी फक्त इतकंच सांगितलं की, घटस्फोटानंतर जेव्हा ते एका कार्यक्रमात भेटले, तेव्हा दोघेही एकमेकांशी बोलले नव्हते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लग्नापूर्वी हे दोघे ३ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते. १९९६ मध्ये लग्न झाल्यानंतर २००१ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.
घटस्फोटानंतर दारू पिऊ लागले यतिन कार्येकर
तुम्ही स्वतःमधील लहान मुलाला का मारून टाकलं? असं विचारल्यावर यतिन कार्येकर म्हणाले, “मला स्वतःला थोडं खंबीर करायची गरज होती, नाहीतर मी भावनांच्या आहारी गेलो असतो आणि मला सगळ्या वाईट सवयी लागल्या असत्या. सर्वात चांगली गोष्ट ही झाली की दारू माझ्या आयुष्यातून निघून गेली. घटस्फोटापूर्वीचा जो एक वर्षाचा कठीण काळ होता, त्यादरम्यान माझी दारू पिण्याची सवय खूप वाढली होती.”
ते पुढे म्हणाले, “मी रोज दारू पित होतो, पण मी स्वतःवरील नियंत्रण गमावत नव्हतो. मी रोज प्यायचो, पण शुद्धीत असायचो, पण २४ तासांपैकी फक्त २ तास झोपायचो. माझी झोप उडाली होती आणि माझ्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ लागले होते. घटस्फोट झाल्यावर मी पहिला विचार केला की दारू बंद करायला हवी. कारण माझ्याकडे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी पैसे नव्हते.”
पूर्णपणे एकटे पडले होते यतिन कार्येकर
यतिन कार्येकर यांनी पुढे सांगितलं, “या सगळ्याचा माझ्या कामावर खूप परिणाम झाला, काम मिळणं कमी झालं. जेव्हा देव देतो तेव्हा खूप देतो, पण जेव्हा तो काढून घेतो तेव्हा पायाखालची जमीनही हिरावून घेतो. माझ्याबरोबरही असंच काहीसं घडलं. कामही नव्हतं आणि आयुष्यात हे सगळं घडत होतं. कुठे जावं, कोणाशी बोलावं हे समजत नव्हतं. माझ्या भावना शेअर करण्यासाठी कोणताही मित्र किंवा कोणीही नव्हतं. एकट्यानेच खूप सहन केलं आणि शेवटी आम्ही वेगळे झालो. एकाच छताखाली अनोळखी व्यक्तींसारखं जगण्यापेक्षा वेगळे होऊन सुखाने राहिलेलं कधीही चांगलं.”
यतिन कार्येकर रॉकी, बाजीराव मस्तानी, पंचम, शिवप्रताप गरुडझेप, दगडी चाळ २, स्वराज्य सौदामिनी ताराराणी, शांती, दगडी चाळ यासारख्या कलाकृतींमधील कामासाठी ओळखले जातात.
