‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरच्या सगळ्याच मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मालिकांमधील रंजक वळणं, नवीन कलाकारांची एन्ट्री यामुळे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन होतं. ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी ‘मुरांबा’ ही मालिका १४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने जवळपास गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मालिका दुपारच्या स्लॉटला प्रसारित होत असली तरीही ‘मुरांबा’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘मुरांबा’ मालिकेत अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय या मालिकेत दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळते. मालिकेत शशांकने अक्षय तर, शिवानीने रमा हे पात्र साकारलं आहे. सध्या मालिका रंजक वळणावर चालू आहे. ऑनस्क्रीन रमाच्या आयुष्यात अनेक संकट येत असली तरी ऑफस्क्रीनवरची रमा काहीशी वेगळी आहे. शिवानी मुंढेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ‘मुरांबा’ मालिकेमुळे तिचा चाहतावर्ग वाढला आहे. तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हेही वाचा : Video : खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी-झहीरची लग्नाआधी घेतली भेट, होणाऱ्या जावयाला सर्वांसमोर मिठी मारली अन्…

शिवानीने इन्स्टाग्रामवर अक्षय कुमारच्या गाण्यावर एक खास डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिला तिच्या ऑनस्क्रीन सासूबाई सुलेखा तळवलकर यांनी साथ दिली आहे. “जेव्हा आपली लाडकी अन् जवळची मैत्रीण आपल्यासारखीच वेडी असते तेव्हा…” असं हटके कॅप्शन देत शिवानीने हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : ‘स्वाभिमान’ फेम अभिनेत्याची ‘झी मराठी’च्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एन्ट्री! साकारणार ‘ही’ भूमिका

शिवानी आणि सुलेखा तळवलकर या व्हिडीओमध्ये पारंपरिक लूकमध्ये अक्षय कुमारच्या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या दोघींचं सुंदर असं बॉण्डिंग पाहून त्यांच्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री स्मिता शेवाळेने या व्हिडीओवर “बापरे…सुलेखा तळवलकर ये बात” अशी कमेंट केली आहे. तर, काजल काटेने या व्हिडीओवर “आम्ही असताना नाही सुचलं तुम्हाला हे बरोबर ना?” अशी कमेंट या व्हिडीओवर केली आहे. यामागचं कारण म्हणजे स्मिता आणि काजल यांनी नुकताच ‘मुरांबा’ मालिकेचा निरोप घेतला. याशिवाय इतर काही नेटकऱ्यांनी देखील या सासू-सुनेच्या जोडीचं भरभरून कौतुक केलं आहे.