छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच विविध हटके ट्विस्ट येत असतात. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अनेकदा नव्या पात्रांची एन्ट्री होते, तर काही वेळेला जुनी पात्रं कथानकात रिएन्ट्री घेतात. ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत आता लवकरच प्रेक्षकांना असा हटके ट्रॅक पाहायला मिळेल.
लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘मुरांबा’ मालिका गेली चार वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये या मालिकेचा पहिला एपिसोड ऑन एअर झाला होता. काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना ‘मुरांबा’मध्ये मोठ्या दुराव्यानंतर अखेर अक्षय आणि रमा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. पण, आता या दोघांच्या नात्यात तिची एन्ट्री पुन्हा एकदा होणार आहे. ही आहे मालिकेची जुनी खलनायिका रेवा राजाध्यक्ष.
‘मुरांबा’ मालिका जेव्हा सुरू झालेली तेव्हा सुरुवातीला अक्षयचं रमावर मनापासून प्रेम नसतं, त्याच्या मनात या नात्याबद्दल बरेच गैरसमज असतात. अक्षय त्यावेळी रेवाला आपली जवळची मैत्रीण मानत असतो आणि रेवाला सुद्धा अक्षयशी लग्न करायचं असतं. अर्थात, रेवाचा कपटीपणा तिने रमा-अक्षयच्या नात्यात नंतर किती अडथळे आणण्याचा प्रयत्न केलाय हे सर्वांसमोर उघड झालेलं आहे. पण, आता हे रेवा नावाचं वादळ रमा-अक्षयच्या नात्यात पुन्हा एकदा एन्ट्री घेत आहे.
‘मुरांबा’ मालिकेत रेवाची भूमिका अभिनेत्री निशानी बोरुळे साकारत आहे. निशानीच्या सोबतीला आणखी एका नव्या अभिनेत्याची या मालिकेत एन्ट्री होतेय, ज्याचं नाव आहे पंकज विष्णू. आता पंकज-निशानी यांच्या एन्ट्रीनंतर ‘मुरांबा’मध्ये काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण, प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार पुन्हा एकदा रेवाला पाहून रमा-अक्षयला चांगलाच धक्का बसला आहे.
‘मुरांबा’ मालिकेचा हा विशेष भाग १५ मार्चला दुपारी २ वाजता आणि सायंकाळी ४ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केला जाईल.
दरम्यान, या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “रेवाचं कमबॅक झालेलं आहे”, “मुरांबा काही केल्या संपणार नाही”, “आता पुन्हा एकदा मजा येईल ही मालिका पाहायला” अशा संमिश्र प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.
