Muramba upcoming twist: ‘मुरांबा’ या मालिकेत सतत कोणते ना कोणते ट्विस्ट येत असल्याचे पाहायला मिळते. रमा आणि अक्षयच्या जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाल्याचे पाहायला मिळाले.
रमा आणि अक्षय या दोघांचेही स्वभाव, वागण्याची पद्धत, त्यांचे शिक्षण या सगळ्यामध्ये खूप फरक आहे. मात्र, लग्नानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर ते प्रेमातही पडले. रमा जशी होती, तसेच अक्षयने तिला स्वीकारले आणि रमानेही अक्षयवर निस्वार्थपणे प्रेम केले. वेळोवेळी त्यांच्यावर संकटे आली, रेवाने, अक्षयच्या वडिलांनी आणि आजीने त्यांना वेगळे करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण, रमा आणि अक्षय कधीच वेगळे झाले नाहीत.
मात्र, जेव्हा अक्षयची आत्या त्यांच्या आयुष्यात आली आणि तिने त्यांना वेगळे करण्यासाठी अनेक कारस्थाने केली. रमा तिच्या लहान मुलीला सोडून निघून गेली. त्यानंतर अक्षयच्या मनात तिच्याबद्दल गैरसमज निर्माण झाला. सात वर्षानंतर जेव्हा रमा आणि अक्षयची पुन्हा भेट झाली तेव्हा त्यांची मुलगी आरोही सात वर्षांची झाली होती.
अखेर रमा-अक्षय एकत्र येणार
रमा आणि अक्षयची आयुष्ये वेगळी झाली होती. अक्षयच्या मनात रमाबद्दल गैरसमज होता पण त्यांचे एकमेकांविषयीचे प्रेम कमी झाले नाही. त्यांच्या मनात एकमेकांबद्दल काळजी, प्रेम होती. जेव्हा रमाने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अक्षयला त्याच्या मनात तिच्याविषयी असलेल्या प्रेमाची जाणीव झाली. त्याने वेगवेगळ्या पद्धतीने तिला ते समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, रमाने तिचा निर्णय बदलला नाही.
आता मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीने, सोशल मीडियावर मुरांबा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की अक्षय त्याची मुलगी आरोहीसह रमाच्या आयुष्यातून कायमचा निघून जात आहे. तो म्हणतो, “रमा तुला सोडून जाणं शक्यच नाही. पण आज नशिबासमोर हार मानली आहे.” तितक्यात त्यांची गाडी एका ठिकाणी थांबते. पुढे गर्दी झाल्याचे दिसते. रमा एका उंच गाडीवर उभी असून ती मोठ्याने म्हणते, “मिस्टर अक्षय मुकादम…”, रमाचा आवाज ऐकल्यानंतर आरोही म्हणते, “बाबा, आई तुला हाक मारतेय.”, त्यानंतर अक्षय गाडीतून बाहेर येतो.
रमा म्हणते, “मी तुमच्यासाठी लग्नाचा मंडप सोडून आली आहे. जिथे कुठे असाल, तिथून बाहेर या प्लीज.” त्यानंतर रमा आणि अक्षय एकमेकांकडे पळत येतात. रमा अक्षयला म्हणते, “आय लव्ह यू, मिरचीचा ठेचा”, त्यावर अक्षयदेखील आय लव्ह यू रमा असे म्हणतो.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “अखेर रमा-अक्षय एकत्र येणार…”, अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
