Muramba Upcoming Twist: ‘मुरांबा’ या मालिकेत सतत काहीतरी ट्विस्ट पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वी रमा व अक्षय पुन्हा एकत्र आले. त्यांनी एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करीत जुन्या गोष्टी मागे ठेवत नवीन सुरुवात केली. मुकादम कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या सगळ्यात रमा व अक्षयची जुनी शत्रू म्हणजे रेवा त्यांच्या आयुष्यात परत आली. याआधी तिला तिच्या कारस्थानांसाठी रमा व अक्षयने तुरुंगात पाठवले होते. त्यामुळे तिला पुन्हा एकदा समोर पाहून सर्वांनाच धक्का बसला. आता मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
रेवा रमाला पुन्हा फसवणार?
स्टार प्रवाह वाहिनीने, मुरांबा या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, रमा संतापाच्या भरात रेवाच्या घराबाहेर येते. तेव्हा ती रेवाचे नाव घेत मोठ्याने म्हणते, “रेवा बाहेर ये. आधी माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिरावून घेण्यासाठी प्रयत्न केलास आणि आता मुलीला? एका आईचा संताप काय असतो, हे आज तुला कळेल.”
रमाचा आवाज ऐकूनही जेव्हा रेवा खोलीबाहेर येत नाही. तेव्हा रमाच तिच्या खोलीत तिचे नाव घेत जाते. तेव्हा रेवा जमिनीवर बसलेली दिसते. तिच्यासमोर एक पाळणा असतो. त्याकडे पाहून ती रडते. त्यात एक लहान बाळाचा फोटो असतो. तितक्यात घरात काम करणारी एक महिला तिथे येते. ती रमाला रेवाबद्दल सांगते. ती म्हणते, “आमच्या ताईसाहेबांचं बाळ गेलं. खूप प्रयत्न केले; पण आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. आमच्या ताईसाहेब कधीही आई होऊ शकणार नाहीत.”
त्यादरम्यान, रेवा त्या फोटोला मिठी मारून रडत असल्याचे दिसते; तर रेवाबद्दल हे सर्व ऐकून रमाला धक्का बसतो. ती रेवाच्या जवळ येते. रेवाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, “मी तुझं दु:ख, तुझ्या भावना समजू शकते. तू कुठल्या परिस्थितीतून जात आहेस, हे मला कळत आहे.” हे सर्व बोलताना रमा दु:खी होते. रमाच्या शब्दांनी भावूक झालेली रेवा रमाजवळ जाते. ती म्हणते, “रमा, आज किती वर्षांनंतर माझ्या जखमेवर कुणीतरी मायेचा हात फिरवला आहे. माझ्यामध्येसुद्धा एक हळवी आई आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव.”
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “एका आईचं दुःख की रेवाचा धोकादायक सापळा…?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, रेवा व रमा खूप घट्ट मैत्रीणी होत्या. मात्र, रमाचे अक्षयशी लग्न झाले. त्यानंतर रेवाच्या मनात अक्षयबरोबर लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानंतर अक्षयला मिळविण्यासाठी रेवाने स्वत:च्याच मैत्रिणीविरुद्ध कट कारस्थान करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांची मैत्री तुटली.
आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
