Muskaan Varshney breaks silence on Casting Couch: अनेक कलाकारांना कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागते. कलाकार जेव्हा इंडस्ट्रीमध्ये नवखे असतात, तेव्हा त्यांना अशा घटनांचा सामना करावा लागतो. अनेक कलाकार याला धाडसाने सामोरे जातात. तसेच, मुलाखतींमध्ये यावर वक्तव्येही करतात. आता एका अभिनेत्रीने तिला आलेला अनुभव सांगितला आहे.
क्राइम पेट्रोल आणि जीना दिल से या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री मुस्कान वार्ष्णेयने एका मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध व्यक्तीने तिच्याकडे कोणत्या गोष्टींची मागणी केली होती, याबद्दल तिने वक्तव्य केले आहे.
अभिनेत्राने नुकतीच फिल्मीमंत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत की म्हणाली की माझ्याबरोबर काही वाईट घडले नाही किंवा मला थेट वाईट बोलले गेले नाही, त्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजते. पण, माझ्याबरोबर असा एक प्रसंग घडला होता.
“मी फक्त १६ वर्षांची…”
मुस्कान वार्ष्णेय म्हणाली , “मी फक्त १६ वर्षांची होते. म्युझिक इंडस्टीतील एका प्रसिद्ध व्यक्तीने मला फोन केला होता. त्याला माझ्याबरोबर म्युझिक व्हिडीओचे शूटिंग करायचे होते. तेव्हा मी गाझियाबादमध्ये राहत होते. फक्त ऑडिशन देण्यासाठी मुंबईला येणे अवघड होते. त्यावेळी दिग्दर्शकाने सुचवले की व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलवर ऑडिशन घेऊया. व्हिडीओ कॉल केल्यानंतर आधी पारंपारिक कपड्यांमध्ये लूक टेस्ट करूयात असे सांगितले. “
“मी साडी नेसलेले फोटो दाखवले नव्हते, सोशल मीडियावरही शेअर केले नव्हते. तर त्या व्यक्तीला साडीमध्ये मी कशी दिसते, ते पाहायचे होते. त्यानंतर त्याने मला ब्लाऊज काढण्यास सांगितले. ते ऐकल्यानंतर मी सुन्न झाले.तो व्यक्ती व्हिडीओ कॉलवर एकटाच होता, त्याची टीम नव्हती. मी त्याला विचारले की असे करण्याची काय गरज आहे? त्यावर तो म्हणाला की ऑफ शोल्डर लूकमध्ये तू कशी दिसतेस, हे मला पाहायचे आहे. पण, माझ्या मनात विचार आला की तो फक्त लूक टेस्टसाठी असे सांगत आहे? त्यानंतर तो थोडा अस्वस्थ झाला आणि दुसऱ्या कॉलचे निमित्त केले आणि फोन बंद केला”, असे म्हणत मुस्कानने तिला आलेला अनुभव सांगितला.
मुस्कान वार्ष्णेयच्या कामाबद्दल बोलायचे तर तिने ‘जीने दिल से’, ‘क्राईम पेट्रोल’, ‘त्रिशना एक चाहत’ आणि ‘द ब्लॅक ट्रुथ’ यांसारख्या प्रोजेक्टमध्ये ती दिसली आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. रील्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
