Kanika Mann: टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कनिका मान सध्या ‘नागिन ७’मुळे (Naagin 7) चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील असा एक काळ उघड केला आहे, जो ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. कनिका जेव्हा अवघी चौथीमध्ये होती, तेव्हा तिच्या चुलत भावाने तिच्याशी गैरवर्तन केले होते. त्या वयात लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्याने आपण गरोदर राहू या भीतीने कनिका प्रचंड हादरली होती. घरातील मोठ्या स्त्रियांच्या गप्पा ऐकून, गर्भपात व्हावा या हेतूने ती गुपचूप पपई खायची. अनेक वर्षे हे दुःख मनात दाबून ठेवल्यानंतर आता कनिकाने यावर जाहीर भाष्य केले आहे.

‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री कनिका मान हिने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, लहानपणी तिच्या चुलत भावाने तिच्याशी गैरवर्तन केले होते आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.

या घटनेमुळे ती इतकी घाबरली होती की, आता ती गरोदर राहील की काय, याची तिला काळजी वाटत होती. त्या वयात कनिकाला गर्भधारणेबद्दल कोणतीही शास्त्रीय माहिती नव्हती. ती म्हणाली, “मी तेव्हा चौथीमध्ये होते. बाळ कसं होतं हे मला माहित नव्हतं. पपई खाल्ल्याने गर्भपात होतो, अशा गोष्टी मी ऐकल्या होत्या, त्यामुळे मी खूप घाबरले होते.”

गर्भपात व्हावा म्हणून भीतीपोटी कनिका पपई खायची

कनिका म्हणाली, “मी भीतीपोटी खूप जास्त पपई खायचे. घरी माझी वहिनी किंवा काकू अशा चर्चा करायच्या की पपई खाल्ल्याने गर्भपात होतो. मला भीती वाटायची की जर मी गरोदर राहिले, तर पपई खाल्ल्याने माझा गर्भपात होईल.” कनिकाने सांगितलं की, लहानपणी जेव्हा ती सुट्ट्यांमध्ये नातेवाईकांकडे जायची, तेव्हा तिचा चुलत भाऊ तिच्याशी अतिशय घाणेरडं वागायचं.

भीतीमुळे आई-वडिलांना काहीच सांगितलं नाही

कनिका त्या वेळी इतकी घाबरलेली होती की तिने याबद्दल आपल्या आई-वडिलांना काहीच सांगितलं नाही. आपल्यालाच या प्रकरणात दोषी ठरवलं जाईल की काय, अशी भीती तिला वाटत होती. काही वर्षांपूर्वीच तिने आपल्या आई-वडिलांना या घटनेबद्दल सांगितलं. या घटनेचा तिच्या बालमनावर खूप खोलवर परिणाम झाला होता. यातून बाहेर येण्यासाठी तिला अनेक वर्षे लागली.

घरच्यांपासून लपून कामाला सुरुवात केली

कनिकाच्या घरच्यांची इच्छा नव्हती की तिने अभिनय क्षेत्रात करिअर करावं. परंतु, तिने कुटुंबाच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला आणि घरच्यांपासून लपून कामाला सुरुवात केली. कनिका ग्लॅमर इंडस्ट्रीत काम करतेय, हे तिच्या आई-वडिलांना खूप उशिरा समजलं.