Surbhi Jyoti Announces Pregnancy : या नवीन वर्षात बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी आई-बाबा झाल्याची खुशखबर शेअर केली आहे. अशातच टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीने लग्नानंतर जवळपास दीड वर्षानंतर गरोदरपणाची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे सुरभी ज्योती.
सुरभीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका सुंदर पोस्टमधून आई होणार असल्याचे सांगितले. ही गुडन्यूज कळताच चाहते आणि तिचे जवळचे मित्र, तसेच कलाकारांनी कमेंट्समधून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सुरभी ज्योतीने पोस्टद्वारे शेअर केली गुडन्यूज
सुरभीने ११ रोजी फेब्रुवारी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये एका बाजूला तिच्या पतीचे पाय, दुसऱ्या बाजूला सुरभीचे पाय आणि मधोमध छोट्या बाळाचे बूट ठेवलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये सर्वप्रथम “ॐ” असे लिहिले आणि पुढे म्हटले, “आमच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर प्रवास आता सुरू होणार आहे. आमचं बाळ यंदा जूनमध्ये या जगात येणार आहे.”
सुरभीने ही आनंदाची बातमी शेअर करताच तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. मौनी रॉय, अनीता हसनंदानीसह अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या. ‘ये है मोहब्बतें’मधील अभिनेत्री कृष्णा मुखर्जीनेही “अरे वा! अभिनंदन” असे म्हणत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर पंजाबी गायिका सिमर कौरनंही “खूप खूप शुभेच्छा” असे लिहिलंय. तसेच श्वेता तिवारी आणि आरती एस. चौहानसह अनेकांनी सुरभी आणि तिच्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
सुरभी ज्योतीने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट
काही काळापासून सुरभी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. त्यामुळे चाहते तिच्या जुन्या पोस्टवर ‘ती कुठे आहे’, असे विचारत होते. आता तिनं स्वतःच यामागचं कारण सांगितलं आहे.
सुरभीबद्दल सांगायचं झाल्यास, ती टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं ‘कुबूल है’, ‘नागिन’, ‘गुनाह’, ‘कोई लौट के आया है’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय ती काही वेब सीरिजमध्येही दिसली आहे. त्यासह तिने ‘इक कुडी पंजाब दी’, ‘रौला पै गया’, ‘क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है?’ व ‘खदारी’ यांसारख्या चित्रपटांतही भूमिका केल्या आहेत.
सुरभीचा पती सुमित सूरीने २०१३ साली ‘वॉर्निंग’ या हिंदी चित्रपटातून छोट्या भूमिकेद्वारे अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर तो ‘व्हॉट द फिश’, ‘बबलू हॅप्पी है’, ‘सुरखाब’ व ‘१४ फेरे’ यांसारख्या चित्रपटांत दिसला. तसेच ‘द टेस्ट केस’ आणि ‘होम’ या वेब सीरिजमध्येही त्यानं काम केलं आहे.

