Nakul Ghanekar work as flight attendant: अभिनेता नकुल घाणेकरने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से, आठवणी सांगितल्या. अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात करण्याआधी नकुल एअर इंडियामध्ये काम करत होता, याबद्दलही अभिनेत्याने मुलाखतीत वक्तव्य केले.
“त्या मालिकेनंतर मी बाबांना म्हणालो होतो की…”
महाराष्ट्र टाइम्सला अभिनेत्याने मुलाखत दिली. त्याला विचारले की, तुम्ही जेव्हा फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होता, त्यावेळी घरातल्यांना अभिनय क्षेत्रात काम करण्याबद्दल सांगितलं होतं का? यावर नकुल म्हणाला, “मी बी.एससी केलं, त्यानंतर एम. एससी केलं, त्यामुळे बाबा म्हणाले होते की एवढं तू शिकला आहेस, तू काहीतरी नोकरी केली पाहिजेस. मी नोकरी करता-करता माझे डान्स स्कूल सुरू केले होते, त्याचाही मी हळूहळू विस्तार करत होतो. नोकरीतून मला जे पैसे मिळायचे, ते पैसे मी घरी द्यायचो. उरलेले पैसे मी माझ्या डान्स क्लासची पब्लिसिटी, हॉलचे भाडे देण्यासाठी वापरायचो.”
पुढे तो म्हणाला, “एक पॉईंट आला होता, नोकरी सुरू करून चार-पाच वर्षे झाली होती; मला एका मालिकेत काम मिळालं. मी मराठी वाहिनीवरील अनोळखी या मालिकेत मला काम मिळालं होतं. त्या मालिकेत काम करता-करता मी नोकरी केली होती. त्या मालिकेनंतर मी बाबांना म्हणालो होतो की मला कंटाळा आला आहे, मी नोकरी करत नाही. मी अभिनय क्षेत्रातच अजून ऑडिशन देतो आणि डान्स क्लासचं काम सुरू ठेवतो; तर मी असं करू का? त्यावर बाबा मला म्हणाले होते की नाही, मला अजून असं वाटत नाही की तू सध्या या क्षेत्रात काम करावं. अजून तू नोकरी कर. अजून मला असं वाटतं की तू स्वत:च्या पायावर उभं राहायला पाहिजेस. मला आता त्याबद्दल विचार करताना वाटतं की मला आनंद आहे, त्यावेळी ते मला असं म्हणाले. कारण- त्यांच्या त्या बोलण्यामुळे जेव्हा मला वेळ मिळायचा, त्यावेळी मी नेटाने डान्स वगैरे करायचो. जेव्हा सुट्टी मिळायची तेव्हा मी ऑडिशन द्यायचो. त्यासाठी मेहनत करायचो, दिग्दर्शकांना भेटायचो आणि मग अशी वेळ आली, जेव्हा मला झी मराठी वाहिनीवरील मालिकेत काम मिळाले, ‘अजूनही चांदरात आहे’, असे मालिकेचे नाव होते.”
नकुल पुढे म्हणाला, “मला आठवतंय की बाबा त्यावेळी आयसीयूमध्ये होते. तेव्हा मी परत बाबांना विचारलं की बाबा नोकरी सोडावी असे वाटत आहे. आता झी मराठी वाहिनीवर काम करतोय. आता डान्स क्लासही चांगला सुरू आहे, तर नोकरी सोडू का? त्यावर बाबांनी मलाच विचारलं की तुला काय वाटतंय? मी म्हणालो की मला असं वाटतंय की नोकरी सोडावी. बाबा म्हणाले की सोड. मला त्यावेळी छान वाटलं. जेव्हा घरातील व्यक्ती तुम्हाला पाठिंबा देते, ती ताकदच वेगळी असते. मला वाटतं की बरं झालं त्यांनी मला सरुवातीला नोकरी करायला लावली. कारण त्याचा मला खूप फायदा झाला. सुदैवाने माझी नोकरी अशी होती की मी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास केला. त्यावेळी मी सालसा हा डान्सप्रकार शिकलो. त्या जॉबमुळे माझ्या नृत्यसंस्थेसाठी मला माझी स्वत:ची जागा घेता आली, त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठी होतं.”
दरम्यान, अभिनेता ‘ठरलं तर मग’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.
