छोट्या पडद्यावरील अशा अनेक मालिका आहेत ज्या आता सुरू नसल्या तरी त्यांचं प्रेक्षकांच्या मनामध्ये आजही खास स्थान आहे. प्रेक्षकांचा निरोप घेऊनही त्यातील पात्र आणि कथेसाठी आजही ओळखल्या जाणाऱ्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘नकुशी’. अभिनेत्री प्रसिद्धी किशोरने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेला आता दहा वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त तिने पोस्ट शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
‘नकुशी’ या ‘स्टार प्रवाह’वरील मालिकेत प्रसिद्धीबरोबर अभिनेते उपेंद्र लिमये मुख्य भूमिकेत होते. १० ऑक्टोबर २०१६ रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि १४ ऑक्टोबर २०१७ला या मालिकेने प्रेक्षकांचं निरोप घेतला. ३२० भाग पूर्ण केलेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. याच मालिकेतून प्रसिद्धी किशोर खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली. तिला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. इन्स्टाग्रामवर आता तिने मालिकेचे काही खास फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
प्रसिद्धीने शेअर केली पोस्ट
इन्स्टाग्रामवर जुने फोटो शेअर करत तिने या पोस्टला “माझ्या पहिल्या मालिकेला प्रदर्शित होऊन आज १० वर्षे पूर्ण झाली. आजही या मालिकेचं माझ्या मनात खास स्थान आहे.” अशी कॅप्शन दिली. यावेळी तिने निर्मिती संस्थेचं आणि दिग्दर्शक वैभव चिंचलकर यांचं कौतुक केलं आहे. तसच सहकलाकार उपेंद्र लिमये, सिद्धार्थ बोडके, स्वाती चिटणीस यांसारख्या कलाकारांना टॅग करुन त्यांचे आभार मानले आहेत.
प्रसिद्धीने यानंतर अनेक मालिकांमध्ये काम केलं. ‘नकुशी’ या मालिकेसह तिने ‘आम्ही दोघी’, ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. यासह तिने ‘ते दोन दिवस’ या चित्रपटातही काम केलं. यासह प्रसिद्धी नाटकातही काम करते. प्रसिद्धी सध्या सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी, तिचे फोटो पोस्ट करत असते.
