Samir Choughule Birthday : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून आपल्या विनोदी शैलीनं महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं मनोरंनज करणारे अभिनेते म्हणजे समीर चौघुले. समीर चौघुलेंचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियामार्फत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
समीर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री नम्रता संभेरावनंही सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यावेळी तिनं समीर यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट करीत त्याला खास कॅप्शन दिली आहे. नम्रतानं या कार्यक्रमादरम्यान समीर चौघुलेंसह अनेकदा भन्नाट विनोदी स्किट सादर केले आहेत. तर अनेकदा मुलाखतींमधून ती समीर यांचं कौतुक करीत त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाल्याचंही सांगत असते.
नम्रतानं समीर यांच्या वाढदिवसानमित्त इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचं कौतुक केलं आहे. नम्रतानं शेअर केलेल्या पोस्टमधून म्हटलं आहे, “सॅम (दादा) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तुला प्रत्यक्ष काम करताना पाहणं आणि तुझ्यासोबत काम करणं निव्वळ सुख, मी तुझी खूप मोठी चाहती आहे. संपूर्ण जगात तुझ्या नावाचा डंका वाजतोय, आम्हाला खूप अभिमान वाटतो तुझा. तू आयुष्यभर असाच उत्साही राहा. आमची प्रेरणा आहेस तू.”
समीर यांनीसुद्धा नम्रताच्या पोस्टखाली “खूप प्रेम”, अशी कमेंट केली आहे. नम्रतानं पोस्ट केलेल्या या फोटोखाली त्यांच्या चाहत्यांनीसुद्धा समीर चौघुलेंना “वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा”, “हॅपी बर्थ डे गानपोपट चौघुले”, “वाढदिवसाच्या शुभेच्छा समीर सर”, “आमच्या चार्ली चॅप्लिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असं म्हणत कमेंट्समधून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, समीर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ते नुकतेच ‘गुलकंद’ या चित्रपटातून झळकले होते. इंडस्ट्रीत बरीच वर्षं काम केल्यानंतर त्यांना या चित्रपटातून मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. समीर चौघुले यांनी आजवर अनेक कार्यक्रमांमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तर ते मराठीतील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. त्यांचे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील स्किट प्रेक्षक पुन्हा पुन्हा यूट्यूबवर जाऊन पाहताना दिसतात. त्यांचे अभिनयातील टायमिंग, विनोद बुद्धी यांमुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे.