आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी लोकप्रिय अभिनेत्री नंदिता पाटकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. ६ एप्रिलला नंदिताचा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला. नंदिताच्या लग्नाचे फोटो अभिनेत्रीच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी शेअर केले होते. मात्र, आता लग्नसोहळा पार पडल्यावर नंदिताने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री नंदिता पाटकरने दुसरं लग्न केलं आहे. तिने नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकरशी लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक सुंदर पोस्ट लिहिली आहे.

नंदिता लिहिते, “एकत्र ट्रॅव्हल करण्यापासून सुरुवात झाली आणि नंतर याचं रुपांतर नॉनस्टॉप गप्पांमध्ये झालं. एकत्र मोठी स्वप्नं पाहिली अन् हा प्रवास आता ‘आज जेवायला काय बनवायचं?’ इथवर येऊन पोहोचला आहे. आम्ही आता मिस्टर अँड मिसेसच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो आहोत.”

नंदिता व विपुल या दोघांनी लग्नसोहळ्यात Twinning केल्याचं पाहायला मिळत आहे. यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अश्विनी महांगडे, ऐश्वर्या नारकर, अभिजीत खांडकेकर, ऋतुजा बागवे, मीनाक्षी राठोड, सुरुची अडारकर, प्रियदर्शिनी इंदलकर या सगळ्या कलाकारांनी नंदिताला नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

नंदिताचे पती विपुल महागावकरबद्दल सांगायचं झालं, तर तो उत्तम नाट्य दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. ‘पै पैशाची गोष्ट’, ‘उध्वस्त धर्मशाळा’ अशा नाटकांच्या माध्यमातून विपुलने आपली ओळख निर्माण केली आहे. तर नंदिताबद्दल सांगायचं झालं तर, तिच्या अभिनय प्रवासाची सुरुवात सुद्धा रंगभूमीवरून झाली होती. यानंतर तिने ‘एलिझाबेथ एकादशी’ सिनेमात काम केलं. स्टार प्रवाहच्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेमुळे तिला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. याशिवाय नंदिताने ‘खारी बिस्किट’, ‘लालबागची राणी’ या सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत नंदिताने तिच्या पहिल्या लग्नावर भाष्य केलं होतं. लग्नानंतर काही काळातच ती पतीपासून विभक्त झाली. आता अभिनेत्रीने आयुष्यात पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात केली आहे.