Star Pravah Marathi Serial Off Air : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नशीबवान’ मालिकेने जवळपास ७ महिन्यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका सप्टेंबर २०२५ मध्ये ऑन एअर झाली होती, आणि या मालिकेचा अंतिम भाग आज प्रसारित करण्यात आला. अपेक्षित टीआरपी न मिळाल्याने अवघ्या काही महिन्यांतच ‘नशीबवान’ मालिकेचा शेवट करण्यात आला.

या मालिकेत दमदार कलाकारांची मांदियाळी होती. आदिनाथ कोठारे, अजय पूरकर, सोनाली खरे या दिग्गज कलाकारांच्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. तर, लोकप्रिय अभिनेत्री नेहा नाईक या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होती. तिने या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं, यासह नेहा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात सुद्धा झळकली होती. आता ‘नशीबवान’ मालिका संपल्यावर नेहाने भावुक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

नेहा नाईक लिहिते, “One Last Time…आज ‘नशीबवान’ मालिकेचा प्रवास इथेच संपत आहे. या सुंदर प्रवासात तुम्ही सर्वांनी नशीबवानची टीम आणि गिरिजावर खूप प्रेम केलंत. साथ दिलीत…त्याबद्दल तुमचे खूप-खूप आभार! स्टार प्रवाह, सतिश राजवाडे, कोठारे व्हिजन आणि आदिनाथ कोठारे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिलीत…त्याबद्दल खूप आभार. या मालिकेच्या संपूर्ण टीमला खूप प्रेम!”

नागेश्वर गिरिजा आणि तिच्या आईला त्यांच्या घराला आग लावून दोघींना जीवे मारण्याचा प्रयत्न करतो. पण, या प्लॅनमध्ये तो स्वत:च अडकतो. रुद्रप्रताप वेळेवर आपल्या बायकोला वाचवण्यासाठी पोहोचतो. सगळे या संकटातून सुखरुप बाहेर येतात. पण, यावेळी गिरिजा नागेश्वरला सांगते, ज्या कागदपत्रांवर तू सह्या घेतल्या ते कागद आतच राहिलेत. प्रॉपर्टीच्या लालसेपोटी नागेश्वर पुन्हा कागदपत्र आणण्यासाठी आगीत उडी घेतो आणि इथेच त्याचा दुर्दैवी अंत होतो, असं या मालिकेच्या शेवटच्या भागात पाहायला मिळालं.

‘नशीबवान’ मालिकेचा हा शेवटचा भाग २५ एप्रिलला दुपारी २:३० वाजता प्रसारित केला गेला. आता यानंतर २७ एप्रिलपासून अडीच वाजताच्या स्लॉटला ‘तुझ्या सोबतीने’ ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. तर, ऊर्जा-इंद्रनीलची ‘वचन दिले तू मला’ ही मालिका सायंकाळी साडेसहा ( ६:३० ) वाजता ऑन एअर होईल.