Bigg Boss Marathi 6 : ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने जवळपास वर्षभर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. या मालिकेने प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. विशेषत: यामधील एजे-लीलाची जोडी सर्वांच्या पसंतीस उतरली होती. एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार याची भूमिका या मालिकेत अभिनेता राकेश बापट साकारत आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेनंतर राकेश कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकून घेण्यासाठी राकेश बापटने ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये एन्ट्री घेतली आहे.

‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन नुकताच सुरू झाला असून यंदा या शोमध्ये एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले आहेत. राकेश बापटचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. शोमध्ये पहिल्या दिवशी राकेश काहीसा शांत वाटला. त्याने फक्त तन्वी-रुचिताच्या भांडणावर “नळावरची भांडणं करताहेत” अशी कमेंट केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी राकेशने विशाल कोटियनला त्याच्या अस्वच्छ वागणुकीबद्दल जाब विचारला आहे.

राकेश घरातील सदस्यांना सांगतो, “ज्यांचे आतमध्ये टॉवेल्स आहेत…तुम्हाला ते धुवायचे असतील तर इथे टाका” यानंतर राकेशने फ्रिजमधील भाज्यांवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले. यावर विशालने त्याला, “आम्ही काय केलं पाहिजे हे तू आम्हाला सांगू नकोस…तू कॅप्टन नाहीयेस अजून” असं सांगितलं.

आता राकेश अन् विशालमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. राकेशचे चाहते त्याच्या समर्थनात या प्रोमोवर विविध कमेंट्स करत आहेत. “कॅप्टन नाहीये अजून…RB फॅमिली आपली दहशत बघताय ना?”, “राकेश भाऊ‌ म्हणजे जाळ आणि धूर”, “राकेश भाऊच्या नादी लागू नको”, “राकेश भाऊ Winner Vibe”, “राकेश बापट आमचा हिरो”, “आमचा हिरो आता नक्की कॅप्टन होईल” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.

दरम्यान, राकेशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर त्याने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. त्याने करिअरची सुरुवात हिंदी चित्रपटांपासून केली होती. राकेशची ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सुपरहिट ठरली होती. कथानक अंतिम टप्प्यावर आल्यावर एजे-लीलाच्या मालिकेने प्रेक्षकांचा मे २०२५ मध्ये निरोप घेतला.