‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमुळे वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ या अभिनेत्री घराघरांत पोहोचल्या. वल्लरीने या मालिकेत लीला ही मुख्य भूमिका साकारली होती. तर, लीलाच्या बहिणीच्या भूमिकेत आलापिनी झळकली होती. मालिकेत या दोघी ऑनस्क्रीन एकमेकींच्या बहिणी होत्या. मात्र, खऱ्या आयुष्यात सुद्धा यांचं बॉण्डिंग तेवढंच छान आहे. वल्लरी-आलापिनी खूप चांगल्या मैत्रिणी असून त्यांचं नातं बहिणींप्रमाणेच आहे.
वल्लरी आणि आलापिनी यांचे रील्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. या दोघींचं नृत्यकौशल्य पाहून चाहतेही थक्क होतात. कधी शास्त्रीय संगीतावर, तर कधी जुन्या मराठी-हिंदी गाण्यांवर वल्लरी आणि आलापिनी थिरकताना दिसतात.
खास गणेशोत्सवानिमित्त वल्लरी-आलापिनी या मैत्रिणींच्या जोडीने ‘मोरया रे’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. शाहरुख खानच्या ‘डॉन’ सिनेमातील या गाण्याची क्रेझ आज २० वर्षांनंतरही कायम आहे. “तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा अगले बरस आना है, आना ही होगा…” असे या गाण्याचे बोल आहेत.
सध्या वल्लरी-आलापिनीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अवघ्या काही तासांतच या व्हिडीओला लाखभर व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय नेटकऱ्यांनी सुद्धा या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
“तुम्हाला डान्स करताना पाहणं हे नेहमीच खास असतं”, “काय एनर्जी आहे वल्लरी कमाल”, “वल्लरी तुला मिस करतोय”, “दोन हसरे चेहरे…कमाल जोडी”, “लय भारी डान्स”, “सुंदर भन्नाट डान्स मस्तच”, “आम्ही किती दिवस या डान्सची वाट बघत होतो”, “वल्लरी सुपर डान्स”, “स्टनिंग परफॉर्मन्स” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.
