Prasad Limaye shares post: चित्रपट, टीव्ही या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे कलाकार अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील भेटीला येतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही व्यक्त होताना दिसतात.
“आई-वडील हे आपल्यासाठी विठ्ठल-रखुमाईसारखे संसाराच्या विटेवर उभे असतात”
अनेकदा हे कलाकार त्यांच्या आयुष्यातील खास, जवळच्या व्यक्तींबाबतही व्यक्त होताना दिसतात. आता अभिनेता प्रसाद लिमयेने एक सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले, “आज हा योगायोग आहे. आज आषाढी एकादशी आहे. विठ्ठल आणि रखुमाई म्हणजे लाखो-करोडो भाविकांचे आई-वडील, सगळ्यांची माऊली आणि आज माझ्या आयुष्यातील विठ्ठल आणि रखुमाईचा वाढदिवस.”
त्याने पुढे लिहिलेय की, आई-बाबा मला तुमची आठवण येत नाही, असा एकही क्षण जात नाही. तुमचा दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असल्याने आजच्या दिवशी मला तुमची खूप जास्त आठवण येते. तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुढे अभिनेत्याने लिहिले, “आई-वडील हे आपल्यासाठी शेवटपर्यंत आणि त्यानंतरही विठ्ठल-रखुमाईसारखे संसाराच्या विटेवर उभे असतात. त्यांची सेवा करा. त्यांना जमेल तेवढं प्रेम द्या. स्वतःच्या आयुष्यात, हृदयात त्यांना जागा द्या. ज्यांनी आपल्याला जपलं, त्यांना चुकूनही कधी अंतर देऊ नका”, असे म्हणत प्रसादने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
प्रसादने त्याच्या दिवगंत आई-वडिलांसाठी ही पोस्ट लिहिली आहे. अभिनेता अनेकदा त्याच्या भावना व्यक्त करताना दिसतो. प्रसादने याआधीही सोशल मीडियावर, विविध मुलाखतींमध्ये आई-वडिलांच्या आठवणी सांगितल्या आहेत. ही पोस्ट शेअर करताना त्याने त्याच्या आई-वडिलांचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.
अभिनेता नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. किशोर या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज प्रमुख भूमिकेत दिसले होते. नवरी मिळे हिटलरला मालिका संपताना प्रेक्षक भावुक झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता मालिकेतील कलाकार आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.