Vallari Viraj On Qualities Of Real Life Partner: अभिनेत्री वल्लरी विराज ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत असून, लीला या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीला व एजेची जोडी लोकप्रिय ठरली आहे. मात्र, अभिनेत्रीला खऱ्या आयुष्यात कसा जोडीदार हवा, याबद्दल वल्लरी विराज, तसेच तिच्या आईने वक्तव्य केले आहे.

त्यामुळे वल्लरीच्या जोडीदाराला…

वल्लरी विराज व तिच्या आईने नुकतीच ‘टेली गप्पा’ या चॅनेलशी संवाद साधला. यावेळी वल्लरी विराजचा जोडीदार कसा असायला पाहिजे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वल्लरी विराजची आई म्हणाली, “एक तर तो तिच्या या प्रोफेशनला खूप प्राधान्य देणारा असावा. खरे तर फक्त जोडीदाराने पाठिंबा देऊन उपयोग नाही. फक्त जोडीदारच नाही, तर तिच्या होणाऱ्या सासूबाबई, सासरे, दीर, जाऊ असतील या सगळ्यांनी तिला पाठिंबा द्यायला हवा.”

“सगळ्यांनी तिला पाठिंबा दिला, तरच ती या क्षेत्रात चांगलं काम करू शकते. जसा मी तिला आता पाठिंबा देते, तसा घरातून पाठिंबा देण्याची खूप गरज आहे. तो तिला सांभाळून घेणारा असावा.” वल्लरी पुढे म्हणाली की, प्राणी आवडणारा असावा. त्यावर तिची आई म्हणाली की, मूळात माझं घरात पेट बोर्डिंग आहे. मी पेट बोर्डिंग चालवते आणि पेट स्पादेखील आहे. त्यामुळे वल्लरीच्या जोडीदाराला प्राणी हे आवडायलाच पाहिजेत. त्याला पर्याय असू शकत नाही. या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.”

जोडीदार कसा असावा यावर वल्लरी विराज म्हणाली, “माझ्या करिअरला पाठिंबा देणारा असावा. कारण- माझं करिअर म्हणजे ९-५ असा जॉब नाही. मी कधीही येते, कधीही जाते. कदाचित १-२ महिने घरीसुद्धा असेन. पण, काम सुरू झालं की, मग वेळ कमी मिळतो. म्हणजे उद्या काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून मी पटकन सुट्टी घेऊ शकत नाही. कारण- मालिका माझ्यासाठी थांबू शकत नाही. माझं जे हे रुटिन आहे, ते समजून घेणारा कुणीतरी हवा.”

तसेच वल्लरी विराजने “तो त्याच्या कामावरही खूप प्रेम करणारा असावा. कारण- मला माझं काम प्रचंड आवडतं. मी आधीही म्हटलं की, मला कधी काही कंटाळा येत नाही. ३६ तास शूटिंग करूनही मी अशी असते की, अजून करू. त्याला जर त्याचं काम आवडत असेल, तर तो माझं काम समजून घेईल. बस एवढंच आहे. बाकी सगळ्या गोष्टी जुळवून घेऊ शकतो”, अशा जोडीदाराबाबत अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, नवरी मिळे हिटलरला ही मालिका सध्या गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांतच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.