Navri Mile Hitlerla Last Episode : ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका येत्या काही दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका लवकरच ऑफ एअर होणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. अखेर मालिकेतील कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर करत शूटिंगचा शेवटचा दिवस पार पडल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय मालिकेत शेवटी काय होणार याचे व्हिडीओ देखील सर्वत्र व्हायरल झाले आहेत.
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत किशोर आणि दुर्गा कारस्थान करून लीला कधीच आई होऊ शकणार नाही यासंदर्भातील खोटे रिपोर्ट्स आजींपर्यंत पोहोचवतात. यामुळे लीला आणि आजीच्या नात्यात दुरावा निर्माण होईल असा त्यांचा समज असतो पण, प्रत्यक्षात असं काहीच घडत नाही. अंतरा आल्यापासून जहागीरदारांच्या घरात सतत काही ना काही घडतंय पण, या सगळ्यात लवकरच लीलाला ती आई होणार असल्याची गुडन्यूज मिळणार आहे. प्रेग्नन्सीची बातमी कळताच लीलाचे डोळे पाणावतात. आता लवकरच ती ही आनंदाची बातमी सर्वांना देणार आहे.
एजे देखील सर्वांसमोर तो लीलाशिवाय त्याचं आयुष्य जगू शकत नाही हे मान्य करतो. त्यामुळे शेवट गोड तर सारंच गोड…यानुसार एजे-लीलाच्या आनंदात सगळेच सहभागी होणार आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या शेवटच्या भागात लीलाचं डोहाळेजेवण थाटामाटात पार पडणार आहे. यामध्ये लीलाच्या तिन्ही सासूबाई तिची काळजी देखील घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
तर, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये एजे-लीलाचं प्रेम पाहून अंतरा देखील आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. शेवटच्या भागात सगळेच जहागीरदार कुटुंबीय आनंदाने एकत्र येऊन लीलाचं डोहाळेजेवण साजरं करतील असं मालिकेत पाहायला मिळेल. शूटिंग संपल्यावर सगळ्या कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानत केक कापून सर्वांचा निरोप घेतला.
दरम्यान, गेल्यावर्षी १८ मार्चला ( २०२४ ) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जवळपास १४ महिने या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेने ‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्यात देखील बाजी मारली होती. आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.