Kamali Serial Promo : कमळी मालिकेत गेल्या काही दिवसांपासून हृषी मुंबई सोडून गावी कोल्हापुरात राहत असल्याचं पाहायला मिळत आहे. कमळीची मनधरणी करून तिला पुन्हा मुंबईत आणायचं, तिला पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं असा हृषीचा हेतू असतो. अर्थात, त्याचं कमळीवर जीवापाड प्रेम देखील असतं. पण, हृषी आणि कमळीला कधीही एकत्र येऊ द्यायचं नाही हे अनिकाने ठरवलेलं आहे. त्यामुळे अनिका सुद्धा हृषीचा शोध घेत कोल्हापुरला येते.
हृषी कमळीच्या गावी कसं आयुष्य जगतोय याचे फोटो ती नयनताराला पाठवते. दुसरीकडे, हृषीचा भाऊ रोहितसुद्धा आईचे कान भरतो. यामुळे भडकलेली नयनतारा कोल्हापुरला जायला निघते. कमळीच्या मनात सुद्धा हृषीबद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे. दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात…एकमेकांसमोर प्रेमाची कबुली देत असतात आणि याचदरम्यान गावात एन्ट्री होते नयनताराची!
हृषी-कमळीला एकत्र पाहून नयनतारा भयंकर संतापते. ती म्हणते, “हृषी…हे सगळं काय सुरूये? आणि कमळी तुला इनामदारांची सून व्हायचं होतं ना…पण खरंच सांगते, आमचं पायपुसणं व्हायची सुद्धा तुझी लायकी नाहीये. सांग कोण आहेत तुझे वडील?”
इतक्यात कमळीची आई तिथे पोहोचते. आपल्या लेकीचा होत असलेला अपमान पाहून ती प्रचंड खचते. कमळीच्या आईला पाहून नयनतारा आणखी भडकते. कारण, तिच साधना ही खोटी ओळख बनवून इनामदारांच्या घरी राहिलेली असते. नयनतारा तिला विचारते, “सांग ना साधना सरोज कोण आहेस तू?…तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? कमळी हिलाच माहिती नाहीये की, तुझा बाप कोण आहे?”
नयनताराने अशाप्रकारे भर गावात, सर्वांसमोर आपल्या आईच्या चारित्र्यावर बोट ठेवणं कमळीला पटत नाही. हा सगळा प्रकार पाहून ती खूप खचते. कमळीला अश्रू अनावर होतात. हृषी तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करतो. हृषी म्हणतो, “माझं प्रेम आहे कमळीवर…कमळी तू चल माझ्याबरोबर”
यावर कमळी ठामपणे सांगते, “नाही! आज माझ्या आईवर कलंक लावलाय… आता ज्यादिवशी तुमची आई स्वत:हून मला स्वीकारेल…त्यादिवशीच मी तुमच्याबरोबर येईन.”
दरम्यान, आता नयनतारा हृषीला पुन्हा एकदा मुंबईला घेऊन जाणार आहे. या सगळ्या प्रकारानंतर कमळी मुंबईत जाणार का? आणि महत्त्वाचं म्हणजे अनिकाने व्हिडीओ कॉल केल्यामुळे कामिनीला सुद्धा कमळी गौरी आणि राजनची मुलगी…अर्थात महाजनांची मोठी नात असल्याचं सत्य समजलं आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या १८ आणि १९ जूनला प्रेक्षकांना हे विशेष भाग पाहायला मिळतील.
