Neelam Shirke : ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘राजा शिवछत्रपती’ यांसारख्या अजरामर मालिका असो किंवा ‘पछाडलेला’, ‘वरात आली घरात’ यांसारखे चित्रपट, या वैविध्यपूर्ण कलाकृतींमधून अभिनेत्री नीलम शिर्केने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला. नायिका, खलनायिका अशा सगळ्या भूमिका नीलमने ऑनस्क्रीन साकारल्या आहेत. नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत तिने जुन्या आठवणींना उजाळा देत त्याकाळच्या मालिकांचे शूटिंगचे काही किस्से देखील सांगितले आहेत.
नीलमने ‘असंभव’ मालिकेत ‘सुलेखा राऊत’ आणि पूर्वजन्मातली ‘इंदुमती’ अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना नीलम शिर्के म्हणते, “असंभव’ मालिका ही ‘वादळवाट’ मालिकेच्या जागी येणार होती. ‘असंभव’ची निर्माती पल्लवी जोशी होती आणि ‘वादळवाट’ मालिकेतल्या बऱ्याच कलाकारांना ‘असंभव’मध्ये सुद्धा कास्ट केलं होतं. मी तेव्हा ‘वादळवाट’च्या सेटवर काही शेवटचे सीन पूर्ण करण्यासाठी आले होते. त्यानंतर मालिका निरोप घेणार होती. मला तेव्हा पल्लवी जोशीने भेटायला बोलावलं होतं. सुरुवातीला मी तिला भूमिकेसाठी नकार दिला होता. पण, त्यानंतर तिने मला फोन केला, मग मी भेटण्यासाठी तयार झाले. अगदी ‘वादळवाट’च्या सेटपासून १० ते १५ मिनिटांवर ‘असंभव’चा सेट लागला होता.”
हेही वाचा : एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
नीलम पुढे म्हणाली, “असंभवच्या सेटवर चॅनेलचे निर्माते, संपूर्ण टीम होती. सेटवर गेल्यावर पल्लवीने मला मालिकेची कथा सांगितली. मग तिने मला नायक, नायिका, व्हॅम्प अशा त्रिकुटाची गोष्ट सांगितली. मी मुख्य खलनायिकेची भूमिका साकारावी अशी तिची इच्छा होती. तरीही माझा नकार कायम होता. शेवटी मी तिला म्हटलं, ‘ज्या भूमिकेसाठी तू मला विचारतेस, त्या भूमिका आधी वेगळ्या दोन अभिनेत्रींना ऑफर केलेल्या आहेत असं माझ्या कानावर आलंय’ सर्वात आधी दोन हिंदीत काम करणाऱ्या अभिनेत्री पायलट शूट करून गेलेल्या, त्यांना तो रोल जमला नाही. त्यानंतर अदिती सारंगधला सुद्धा भूमिकेसाठी विचारणा केली होती.”
अदिती सारंगधरबद्दल काय म्हणाली नीलम शिर्के?
पुढे अदिती सारंगधरबद्दल बोलताना नीलम म्हणाली, “अदिती आणि मी वादळवाटमध्ये ८ वर्षे एकत्र काम केलं होतं. आमच्यात एक टक्कर नक्कीच होती, पण त्याला तुम्ही ‘हेल्दी टक्कर’ होती म्हणू शकता. एकांकिका करून ती पण आली होती, मी सुद्धा तिथूनच आले होते. आम्ही दोघीही परफॉर्मिंग आर्टिस्ट होतो. कुठेही आम्ही गुडी-गुडी नव्हतो, आपल्याला आलेला सीन कसा वाजवायचा हे आम्हाला चांगलं जमायचं. ‘वादळवाट’मध्ये आम्ही दोघींनी बरेच सीन एकत्र केलेत आणि गंमत म्हणजे आमच्या दोघींचे एकत्र सीन पाहण्यासाठी संपूर्ण टीम बसायची. ते क्लॅश बघायला लोकांनाही आवडायचं.”
हेही वाचा : ‘या’ मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीने २५ व्या वर्षी गुपचूप उरकलं लग्न, पतीही आहे प्रसिद्ध अभिनेता; फोटो आले समोर
अभिनेत्री पुढे म्हणाली, “असंभव’च्या भूमिकेची कथा आणि अदितीला ऑफर झालीये हे ऐकल्यावर मी मालिकेच्या टीमला सांगितलं होतं, आमच्या दोघींचं पटत नाही किंवा आम्ही एकमेकींच्या प्रतिस्पर्धी आहोत म्हणून तुम्ही तिला सोडून मला भूमिका देत असाल, तर मला तसं करायचं नाहीये. ती खूप चांगली आर्टिस्ट आहे, ऑनस्क्रीन आमचं काही असेल पण, तरीही ऑफस्क्रीन ती माझी मैत्रीण आहे. आता सध्याचं सांगायचं झालं तर खूपच चांगली मैत्रीण आहे. आता त्यावेळचा तो अल्लडपणा, बालिशपणा आठवून हसायला येतं.”
“भूमिका करणार की नाही हे मी थोड्या दिवसात कळवेन असं सांगून मी सेटवरून ( असंभव मालिकेचा सेट ) निघाले, शेवटी जाताना पल्लवीचा नवरा म्हणजेच मिस्टर अग्निहोत्री मला म्हणाले, ‘ही मालिका तीन पात्रांभोवती फिरते. नायक, नायिका, खलनायिका या तिघांमध्ये जो उत्तम सादरीकरण करेल त्याच्या मागे ही संपूर्ण मालिका धावेल. तुम्ही विचार करा आणि सांगा कारण, तुम्ही खरंच खूप चांगल्या आर्टिस्ट आहात.’ ते शब्द मला भावले, अर्थात त्यांनी दिलेला सल्ला पुढे योग्यच ठरला. त्यामुळे मी नीट विचार केला कारण, सुरुवातीला अदितीकडे भूमिका असल्याने माझ्या मनात थोडी द्विधा मनस्थिती होती. पण, नंतर पल्लवीने सतत फोन केले, शेवटी तिने चॅनेलला नीलम शिर्के हवीये असंही सांगितलं. आम्ही दोघांनी चर्चा केली आणि मग फक्त २ तास माझं शूट करायचं असं ठरलं आणि मी होकार दिला. पण, माझी एक अट होती ती म्हणजे, मी पल्लवीला सांगितलं होतं, तुम्ही अदितीबरोबर बोला कारण, ती पण एक कलाकार आहे आणि मी सुद्धा एक कलाकार आहे. उगाच आमच्यात क्लॅश नको. पुढे, मालिका सुरू झाली आणि माझी ही भूमिका प्रचंड गाजली, अनेक पुरस्कार देखील मिळाले.” असं नीलम शिर्केने सांगितलं.