Neena Gupta Archana Puran Singh Shreeman Shrimati Story: अभिनेत्री नीना गुप्ता या ८० च्या दशकापासून सिनेविश्वामध्ये सक्रिय आहेत. सिनेमांमध्ये काही भूमिका साकारल्यानंतर त्यांनी मालिकाविश्वामध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी दूरदर्शनवरील ‘श्रीमान श्रीमती’ या लोकप्रिय विनोदी मालिकेत काम केले. त्यामध्ये पूर्वी अभिनेत्री अर्चना पूरन सिंह काम करीत होत्या; पण नंतर निर्मात्यांनी नीना यांना कोणतीही कल्पना न देता अचानक मालिकेतून काढून टाकल्याचा किस्सा नीना गुप्ता यांनी सांगितला आहे.

‘झूम’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नीना गुप्ता यांनी अर्चना पूरन सिंह मालिकेमध्ये पुन्हा परत आल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकले गेल्याचे सांगितले. ‘श्रीमान श्रीमती’ या लोकप्रिय शोमध्ये अर्चना, राकेश बेदी, रीमा लागू व जतिन कनाकिया हे मुख्य भूमिका साकारत होते. मात्र, या मालिकेबाबत आठवणी सांगताना नीना गुप्ता म्हणाल्या, ” ‘श्रीमान श्रीमती’मध्ये माझ्यावर खूप अन्याय झाला होता. माझ्याबरोबर नेमकं काय झालं होतं, हे तुम्हाला माहीत नाही.”

अर्चना पूरन सिंह प्रसूती रजेवर गेल्याने नीना गुप्तांनी स्वीकारलेली मालिका

‘श्रीमान श्रीमती’मध्ये अर्चना पूरन सिंह या ‘प्रेमा शालिनी’ ही भूमिका करीत होत्या. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती; पण त्या गरोदर असल्यामुळे अर्चना प्रसूती रजेवर गेल्या. त्यानंतर निर्मात्यांनी अर्चना यांच्या जागी सपना हे नवीन पात्र निर्माण केले आणि ती भूमिका नीना गुप्ता यांनी साकारली. अर्चना पूरन सिंह पुन्हा मालिकेमध्ये येणार नाहीत, अशी समजूत झाल्याने नीना यांनी भूमिका स्वीकारली होती.

पुढे नीना म्हणाल्या, “अर्चना ती भूमिका करीत होती. ती गरोदर असल्यानं त्यांनी माझी निवड केली. गरोदरपणाच्या सुटीनंतर अर्चना परत येणार का, याबाबत मी निर्मात्यांना विचारले होतं. त्यावर त्यांनी नाही, असं स्पष्ट उत्तर दिलं होतं. अर्चना परत येणार नसल्यामुळे मी मालिका करण्यास होकार दिला होता.”

मी ते आव्हान स्वीकारले होते – नीना गुप्ता

    पुढे नीना म्हणाल्या, “जेव्हा एखादी मालिका प्रचंड हिट झालेली असते आणि अर्चनासारखी चांगली अभिनेत्री ती भूमिका यशस्वीरीत्या साकारत असेल, तर त्यावेळी अशा अभिनेत्रीची जागा घेणे खूप कठीण असते. लोक तुम्हाला सहजपणे स्वीकारत नाहीत. तरीही मी ते आव्हान स्वीकारले होते.”

    नीना गुप्तांना प्रॉडक्शन टीमने संपर्क केला नव्हता

    नीना गुप्ता यांनी ‘श्रीमान श्रीमती’मध्ये २२ एपिसोडमध्ये काम केले होते; पण एकदा दिल्लीमध्ये मैत्रिणींबरोबर फिरायला गेलेल्या असताना त्यांना मालिकेतून काढून टाकल्याचे एका सहकलाकाराकडून कळाले होते. नीना यांना राकेशने सांगितले की, दुसऱ्या दिवशी शूटिंग होणार आहे; हे ऐकून नीना यांना धक्काच बसला होता.कारण- प्रॉडक्शन टीममधून त्यांना कोणीही संपर्क केला नव्हता. नीना म्हणाल्या, “माझ्या मैत्रिणीनं मला विचारलं की, तू अजूनही मालिकेत आहे का? मला काहीही न सांगता, अर्चना पूरन सिंहला परत आणले होते.”