Neena Kulkarni talks about Sugar Modak: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी गणेशोत्सवानिमित्त खास मोदक बनवले आहेत. त्यांनी व्हिडीओ शेअर करीत मोदकाची रेसिपी सांगितली. त्या वर्षानुवर्षे साखरेचे मोदक बनवतात, असे त्यांनी सांगितले.

नीना कुलकर्णींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. त्यांनी सुंदर साडी नेसली आहे. नाकात नथ, गळ्यात दागिनेस असा मराठमोळा लूक त्यांनी केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला त्या गणपती बाप्पा मोरया, असे म्हणतात.

नीना कुलकर्णींनी बनवले साखरेचे मोदक

पुढे त्या म्हणतात, “सालाबादप्रमाणे सगळ्यांच्या घरी मोदक बनतात. तसेच आमच्याकडेही होतात. मी सालाबादप्रमाणेच उत्कृष्ट मोदक करण्याचा प्रयत्न करीत असते. आमच्या मोदकांची गंमत अशी आहे की, आमच्याकडे साखरेचं सारण असतं. माझी आई साखरेचं सारण करायची आणि मला असं वाटतं की, आमच्या आजोळीही साखरेचंच सारण होतं. का, कारण वगैरे मला माहीत नाही. पण, आई म्हणायची की, साखरेचं खाणार त्याला देव देणार. माझ्या डोक्यात ते पक्कं बसलं आहे. आमच्या गणरायासाठी जो २१ मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो, त्यामध्ये साखरेचं सारण असतं. मोदक बरोबर होतील की नाही, अशी दरवर्षी थोडीशी धाकधूक असते.”

व्हिडीओमध्ये पुढे त्या मोदक करताना दिसल्या. त्या म्हणाल्या, “मला साखरेचे मोदक इतके आवडतात की, मला तेच खावेसे वाटतात. हलके असतात आणि ते तोंडात विरघळतात. कमी लोक साखरेचे मोदक करतात. आता हा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर मला अनेक जण सांगतील की, आमच्याकडेही साखरेचे मोदक होतात. पण, साखरेच्या मोदकांची जी चव आहे ना, ती अनोखीच आहे, असं मला तरी वाटतं. आमच्या गणरायाकरता मी २१ मोदकांचा नैवेद्य केला आहे.”

नीना कुलकर्णी (व्हिडीओ सौजन्य: इन्स्टाग्राम)

हा व्हिडीओ शेअर करताना नीना कुलकर्णींनी ‘साखरेचं खाणार त्याला देव देणार’, अशी कॅप्शन दिली आहे. त्यांच्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच, कलाकारांनीही कौतुक केले आहे. मुग्धा गोडबोलेंनी लिहिले, “नीनाताई किती गोड दिसत आहेस”, नेहा पेंडसेने लिहिले, “ताई, खूप सुंदर दिसत आहेस. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा”, सुकन्या मोनेंनी लिहिले, “तू आणि तुझं मधाळ बोलणं, सगळंच एकदम सुरेख आणि सुबक”, अशा अनेकविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, नीना कुलकर्णी नाटक आणि मालिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.