मराठी मनोरंजनविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नानंतर अभिनय क्षेत्राला रामराम केल्याचं पाहायला मिळालं आहे. बॉलीवूडसह मराठी सिनेविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या विवाहबंधनात अडकल्यावर परदेशात स्थायिक झाल्या आहेत. अशाच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने काही वर्षांआधी अभिनय सोडून परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही नायिका नुकतीच भारतात परतली आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे पाहुयात…

‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजेच अभिनेत्री नेहा गद्रे. नेहा गेल्या काही वर्षांपासून आपल्या पतीसह ऑस्ट्रेलियात राहायची. मात्र, जवळपास दोन महिन्यांपूर्वी ती पती अन् मुलासह भारतात परतली आहे. ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकांमुळे आणि ‘मोकळा श्वास’ या चित्रपटामुळे नेहाला एक वेगळी ओळख मिळाली होती. परंतु, गेली काही वर्षे ती अभिनयापासून दूर होती. मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई’ या चित्रपटात तिने कॅमिओ केल्याचं पाहायला मिळालं.

नेहाने वैयक्तिक आयुष्यात २ मार्च २०१९ मध्ये तिने ईशान बापटशी विवाह केला. यानंतर अभिनेत्री आपल्या पतीसह ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. या जोडप्याच्या घरी १० फेब्रुवारी २०२५ रोजी गोंडस मुलाचं आगमन झालं. नेहा गद्रेने तिच्या बाळाचं नाव इवान असं ठेवलं आहे. आता पती अन् मुलासह नेहा गद्रे पुण्यात आहे.

नेहा गद्रेने अलीकडेच पुण्यात लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा रायकर यांची भेट घेतली. स्नेहा यांनी नेहाबरोबरचा कॅफेतील फोटो शेअर केला आहे. त्या लिहितात, “मित्र-आवडते पदार्थ अन् मज्जा! काही नाती खूप जवळची असतात. आमच्या ग्रुपमधील सर्वात लहान सदस्य आता गोंडस बाळाची प्रेमळ आई झाली आहे. विश्वासच होत नाहीये…दिवस कसे लवकर निघून जातात!” या दोघींनी एकत्र ‘अजूनही चांदरात आहे’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं.

दरम्यान, नेहाने गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अनेक कॅफेज, रेस्टॉरंटला भेट दिल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच तिने ‘लाडकी विहिण योजना’ हे नाटक सुद्धा पाहिलं. आता अभिनेत्री कायमची भारतात आलीये की, ती पुन्हा ऑस्ट्रेलियात जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.