Neha Kakkar Sunidhi Chauhan Reality Show Controversy: मालिका विश्वातील ‘इंडियन आयडल’ हा रिअॅलिटी शो प्रचंड लोकप्रिय असून नुकताच याचा १६ वा सीझन संपला. या शोला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून टीआरपीमध्ये तो वरच्या स्थानावर राहिला आहे. पण, तरीही गाण्याच्या रिअॅलिटी शोचा टीआरपी कमी असल्याची चर्चा रंगली होती. यावर आता नेहा कक्करने प्रतिक्रिया दिली असून तिने सुनिधी चौहानच्या जुन्या वक्तव्यावरही अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

बॉलीवूडची लोकप्रिय गायिका सुनिधीने यापूर्वी रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांच्या सर्व कहाणी या खोट्या व बनावट असल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये फेरफार केल्याचा दावा केला होता. २०२४ मध्ये राज शामानी यांच्या पॉडकास्टमध्ये तिने रिअॅलिटी शोबद्दल तिचे मत व्यक्त केले होते. सुनिधी म्हणालेली, “मला सुरुवातीचे दोन वर्षे रिअॅलिटी शो करायला मज्जा आली, पण पुढे चित्र बदलत गेले. पूर्वी रिअॅलिटी शो खरे आणि वास्तवदर्शी वाटायचे, पण आता टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या शोमध्ये खूप काही बदलले आहे. आदल्या दिवशी चांगल्या गाणाऱ्या स्पर्धकाचे कौतुक केले जाते आणि दुसऱ्या दिवशी त्याला काढून टाकले जाते.”

मी स्पष्टपणे नकार दिला – सुनिधी

पुढे सुनिधी म्हणाली, ‘द व्हॉइस इंडिया’मध्ये सहभागी होताना मी काही अटी ठेवल्या होत्या आणि त्या मान्य करण्यात आल्या होत्या, त्यामुळे प्रेक्षकांना ऐकू येणारे गाणे हे खरे होते, त्यामुळे चांगलं वाटत होतं. पण, ‘दिल है हिंदुस्तानी’मध्ये स्पर्धकांच्या बनावट गोष्टी तयार करण्यात आल्या होत्या. एखाद्या स्पर्धकाला शोमध्ये पुढे नेण्यासाठी त्याच्याबद्दल चांगले बोलण्यास सांगितले जात होते, यासाठी मी स्पष्टपणे नकार दिला होता.”

सुनिधी चौहानच्या आरोपांवर काय म्हणाली नेहा कक्कर?

रिअॅलिटी शो ‘स्क्रिप्टेड’ असल्याच्या सुनिधी चौहानच्या आरोपांवर नेहा कक्करने प्रतिक्रिया दिली. नेहा म्हणाली, “मी हा शो करणे थांबवल्यामुळे ‘इंडियन आयडॉल’ची लोकप्रियता कमी झाली. जोपर्यंत मी शो करत होते, तोपर्यंत त्याचा टीआरपी (TRP) चांगला होता; पण ते म्हणतात ना,कोल्ह्याला द्राक्षे आंबट… ‘हा तसाच प्रकार आहे. शो अजिबात ‘स्क्रिप्टेड’ नसतो; कारण लोकांचे आयुष्य काही स्क्रिप्टनुसार चालत नाही. आपण सर्वजण एकाच परिस्थितीतून पुढे आलो आहोत, त्यामुळे स्पर्धकांचा संघर्ष ऐकून भावूक होणं आणि त्यांच्या गोष्टी ऐकून डोळ्यांत पाणी येणं स्वाभाविक आहे.”

दरम्यान, नेहा कक्कर ‘इंडियन आयडल’च्या दहाव्या ते तेराव्या सीझनपर्यंत जज होती. २०२४ मध्ये ती ‘सुपरस्टार सिंगर ३’मध्ये जज म्हणून दिसली होती. ‘इंडियन आयडल १६’मध्ये श्रेया घोषाल, बादशाह व विशाल ददलानी हे परीक्षक होते.