‘लागिरं झालं जी’ ही मालिका संपून आता जवळपास सहा वर्षे उलटली आहेत. तरीही या मालिकेचा चाहतावर्ग आजही मोठ्या प्रमाणात आहे. अज्या-शितलीची जोडी, त्यांचा मित्र विक्या, हर्षवर्धन ही सगळी पात्र आजही घराघरांत लोकप्रिय आहेत. हे सगळे कलाकार ‘लागिरं झालं जी’नंतर नवनवीन प्रोजेक्ट्सच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जवळपास वर्षभरापूर्वी या मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड लग्नबंधनात अडकला होता. यावेळी ‘लागिरं झालं जी’च्या टीमचं रियुनियन पाहायला मिळालं होतं. आता किरणपाठोपाठ विक्रमची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल चव्हाण देखील लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

निखिल चव्हाणने ‘लागिरं झालं जी’ मालिकेत अज्याच्या जवळच्या मित्राची भूमिका साकारली होती. ही सिरियल संपल्यावर पुढे वर्षभरातच निखिल ‘झी मराठी’च्या ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकला. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री अनुष्का सरकटेने मुख्य भूमिका साकारली होती. जवळपास दीड वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यादरम्यान अनुष्का-निखिलची जोडी सर्वांच्या पसंतीस उतरली होती. आता ही रील लाइफ जोडी खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र येणार आहे.

अनुष्का आणि निखिलचं लग्न जमलं असून सुपारी फोडण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून निखिल-अनुष्का एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर या सगळ्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत…त्यामुळे या दोघांच्याही चाहत्यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे.

‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड निखिलचा खूप जवळचा मित्र आहे. किरणचं लग्न पार पडल्यावर चाहते निखिलला, “आता तुझं लग्न कधी?” असे प्रश्न विचारत होते. आता किरणनेच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत अनुष्का-निखिल लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं आहे.

किरण गायकवाडने या दोघांचा फोटो शेअर करत यावर “You Did It!” हा इमोजी शेअर केलाय. तसेच या फोटोच्या बॅकग्राऊंडला ‘दुल्हा बनाईब’ हे भोजपुरी गाणं लावलं आहे. आता लग्न ठरल्यावर अनुष्का-निखिलचा साखरपुडा केव्हा पार पडणार?, या दोघांचं लग्न केव्हा असेल असे बरेच प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.

kiran gaikwad post
किरण गायकवाडची पोस्ट

दरम्यान, सध्या संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वातून अनुष्का सरकटे व निखिलवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ती ‘स्टार प्रवाह’च्या ‘वचन दिले तू मला’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.