Anushka Sarkate & Nikhil Chavan Wedding : अनुष्का सरकटे व निखिल चव्हाण यांचा विवाहसोहळा आज ( २४ जून ) छत्रपती संभाजीनगर येथे थाटामाटात पार पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची मराठी मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरू होती. अखेर मेहंदी सोहळा, हळद, साखरपुडा, संगीत पार पडल्यावर आज अनुष्का-निखिल साता जन्माचे सोबती झाले आहेत.
अनुष्का सरकटे व निखिल चव्हाण यांच्या लग्नाला राजकीय वर्तुळातील मान्यवरांसह लोकप्रिय मराठी कलाकार सुद्धा उपस्थित होते. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, मयुरेश व मनपीत पेम, इंद्रनील कामत, किरण गायकवाड, वैष्णवी कल्याणकर, श्वेता शिंदे, राहुल मगदुम, तेजपाल वाघ असे अनेक कलाकार या दोघांच्या लग्नाला पोहोचले होते.
सध्या अनुष्का-निखिलच्या लग्नातील अनेक फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनुष्काने लग्न लागताना गुलाबी रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली होती. नऊवारी साडी, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, नाकात नथ, मुंडावळ्या या लूकमध्ये अनुष्का खूपच सुंदर दिसतेय. लाडक्या लेकीचं लग्न लागताना अनुष्काच्या आई-बाबांचे डोळे पाणावले होते.
अनुष्का व निखिलने लग्नमंडपात अनोख्या पद्धतीने एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं. डोक्यावर तुळस, हाती झेंडा घेत अगदी पारंपरिक स्वरुपात हे दोघंही मांडवात पोहोचले होते. अनुष्का उखाणा घेत म्हणते, “उखाणा घे…उखाणा घे अशी सगळ्यांनाच झालीये घाई! निखिल माझा विठुराया मी त्याची रखुमाई!”
दरम्यान, निखिल-अनुष्काची मैत्री ‘कारभारी लयभारी’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान झाली होती. या मालिकेत त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. यादरम्यान, माझे बाबा ज्या मुलावर हात ठेवणार…त्याच्याशीच मी लग्न करणार असं अनुष्काने आधीच निखिलला सांगितलं होतं. आता ही रील जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याने त्यांचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत.
दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या निखिल चव्हाण ‘ऑल दि बेस्ट’ नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय. तर, अनुष्का सरकटे ‘वचन दिले तू मला’ मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकत आहे.
