Lakshmi Niwas Actor Nikhil Rajeshirke Wife Baby Shower : रोहन गुजर, अधोक्षज कऱ्हाडे अशा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या घरी नुकतंच चिमुकल्यांचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं. आता या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. या अभिनेत्याचं नाव आहे निखिल राजेशिर्के. सध्या हा अभिनेता ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

निखिलने वैयक्तिक आयुष्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये लग्न केलं. अभिनेत्याच्या पत्नीचं नाव आहे चैत्राली मोरे. एप्रिल २०२४ मध्ये निखिल-चैत्रालीने साखरपुडा केला होता आणि त्यानंतर हे दोघंही लग्नबंधनात अडकले. आता लवकरच या जोडप्याच्या आयुष्यात गोंडस बाळाचं आगमन होणार आहे. निखिलच्या पत्नीचं डोहाळेजेवण थाटामाटात पार पडलं असून, याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमादरम्यान निखिल आणि चैत्राली यांनी सुंदर फोटोशूट केलं आहे. पोपटी रंगाची साडी, फुलांचे दागिने, नाकात नथ, केसात गजरा या लूकमध्ये अभिनेत्याची पत्नी खूपच सुंदर दिसतेय. निखिलने बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी जाहीर करताच मराठी कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. स्वाती देवल, सुयश टिळक, नम्रता संभेराव अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत निखिलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, निखिलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत संतोष ही भूमिका साकारत आहे. संतोष लक्ष्मी-श्रीनिवासचा मोठा मुलगा असतो, तो पैशांच्या मागे वेडा असतो. नात्यांपेक्षा संतोषच्या आयुष्यात पैशांना जास्त महत्त्व असतं. त्याच्या या स्वभावाला सगळेच कंटाळलेले असतात असं मालिकेत पाहायला मिळतं. त्याचं हे पात्र सर्वत्र तुफान गाजतंय.

याशिवाय निखिलने ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘रंग माझा वेगळा’, ‘अजूनही बरसात आहे’ अशा विविध गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय तो ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाला होता. मात्र, या शोमधून त्याचा प्रवास लवकर संपला.