Nikki Tamboli and Arbaaz Patel Breakup Prank : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे अभिनेत्री निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. शोदरम्यान सुरुवातीला या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली, पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता गेल्या दोन वर्षांपासून निक्की-अरबाज एकत्र आहेत. ही जोडी सोशल मीडियावर सुद्धा रोमँटिक फोटो शेअर करत असते. पण, गेल्या काही दिवसांपासून निक्की-अरबाजच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात होतं.

निक्की-अरबाजने हार्टब्रेक झाल्याच्या पोस्ट शेअर केल्या होत्या. दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं होतं. यामुळे सर्वत्र या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, निक्की-अरबाजने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. “लवकरच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील” असं या दोघांकडून सर्वत्र सांगण्यात येत होतं. मात्र, आता या सगळ्या ब्रेकअप ड्रामाचा उलगडा झालेला आहे.

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे दोघंही ‘किसी और की गली’ ( Kishi Aur Ki Gali ) गाण्यात एकत्र झळकले आहेत. हे एकप्रकारचं ब्रेकअप साँग आहे. प्रेयसी आपल्या प्रियकराला फसवते, मग तो तिला रंगेहाथ पकडतो अशी एकंदर या गाण्याची स्टोरी आहे. त्यामुळेच निक्की-अरबाजने हा सगळा ब्रेकअप ड्रामा केला होता. दोघंही अजून एकत्रच आहेत. निक्की या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “आम्ही तुम्हाला सर्वांना Confused केलं, पण आता खरी गोष्ट सर्वांसमोर आलेली आहे.”

निक्की-अरबाज एकत्र आहेत, दोघांचं ब्रेकअप झालेलं नाहीये ही बातमी समोर येताच त्यांचे फॅन्स खूश झाले आहेत. तर, काही नेटकऱ्यांनी या जोडप्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. फक्त एका गाण्याच्या प्रमोशनसाठी ब्रेकअपचं एवढं मोठं नाटक केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे. तर, जवळच्या मित्रमंडळींनी या म्युझिक व्हिडीओवर कमेंट्स करत या दोघांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, एकंदर निक्की-अरबाजच्या नात्याची चर्चा आता संपूर्ण इन्स्टाग्रामवर रंगली आहे. या दोघांनी यापूर्वी ‘The 50’ या शोमध्ये एकत्र सहभाग घेतला होता. यावेळी अरबाजने गुडघ्यावर बसून निक्कीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. मात्र, अभिनेत्रीच्या वडिलांची त्यांच्या या आंतरधर्मीय नात्याला संमती नाही असंही तिने सांगितलं होतं.