रिअॅलिटी शोमध्ये अनेक नाती जोडली जातात, काहींना आयुष्याचे जोडीदार भेटतात, तर शो संपल्यावर अनेकांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं यापूर्वी आपल्याला पाहायला मिळालं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे अशीच एक चर्चेत आलेली जोडी म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. या दोघांच्या मैत्रीची, त्यांच्या बॉण्डिंगची शो सुरू असताना बरीच चर्चा झाली. निक्कीच्या आईने ‘बिग बॉस’च्या घरात तिला अरबाजपासून दूर राहा असं सावधही केलं होतं. पण, शो संपल्यावर दोघंही एकत्र आले, एकत्र राहू लागले. त्यांनी सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिल्याचंही पाहायला मिळालं होतं.
निक्की-अरबाज कायमच एकमेकांसाठी रोमँटिक फोटो शेअर करायचे, बर्थडे विश करायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे. याला कारण ठरल्या आहेत…या दोघांनी शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्ट. या दोघांनी अद्याप त्यांचं नातं संपल्याची किंवा ब्रेकअपची अधिकृत घोषणा केलेली नाहीये. पण, त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलेलं आहे.
अरबाजने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, “जोडीदाराची फसवणूक करणे…त्यानंतर घरी येणं, त्याच्या डोळ्यात पाहून ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असं सांगणं. याला समोरच्या माणसाचा disrespect करणं म्हणतात. जे बोलायचं होतं ते मी बोललो आहे” या पोस्टमध्ये त्याने कुणाचंही नाव घेतलेलं नाही किंवा कोणालाही टॅग केलेलं नाहीये. पण, नेटकऱ्यांनी तो निक्कीबद्दल बोलत असल्याचा अंदाज बांधला आहे.
यानंतर निक्कीची पोस्टही चर्चेत आली आहे. ती म्हणाली, “सत्य कधीच सांगितलं जात नाही…अफेअर्स केवळ एखादी नवीन व्यक्ती अत्यंत आकर्षक वाटते म्हणून होत नाहीत; तर जुन्या जोडीदाराने दिलेली वचनं न पाळल्यामुळे आणि आदर करणं थांबवल्यामुळे होतात”
यानंतर अरबाजने शेअर केलेली आणखी एक स्टोरी चर्चेत आलीये यात तो म्हणतो, “चुप रहें तो इल्जाम लग गए, बोल पड़े तो रिश्ते टूट गए।”

एकंदर निक्की-अरबाजच्या नात्याची चर्चा आता संपूर्ण इन्स्टाग्रामवर रंगली आहे. दरम्यान, या दोघांनी यापूर्वी ‘The 50’ या शोमध्ये एकत्र सहभाग घेतला होता. यावेळी अरबाजने गुडघ्यावर बसून निक्कीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. मात्र, अभिनेत्रीच्या वडिलांची त्यांच्या या आंतरधर्मीय नात्याला संमती नाही असंही तिने सांगितलं होतं.
