‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. प्रियदर्शनी इंदलकर, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, ओंकार राऊत, निखिल बने, रोहित माने अशा अनेक कलाकारांना या कार्यक्रमामुळे एक वेगळी ओळख मिळाली. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने दर आठवड्यात हास्यजत्रेच्या रंगमंचावर कोण हजेरी लावणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असते.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात अभिनेता ओंकार भोजनेने अलीकडेच फक्त एका भागासाठी एन्ट्री घेतली होती. त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त तो हास्यजत्रेत आला होता. त्याच्या येण्याने हास्यजत्रेचे चाहते प्रचंड आनंदी झाले होते. आता लवकरच प्रेक्षकांना आणखी एक सरप्राईज मिळणार आहे. कारण, आगामी भागात विनोदाचं अचूक टायमिंग साधत संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्री निर्मिती सावंत हास्यजत्रेत येणार आहेत.




हेही वाचा : “मुलांना इतिहास शिकवायचा असेल तर…”, शिवकालीन किल्ल्यांविषयी मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले, “आताच्या आळशी…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘सोनी मराठी’च्या टीमने याचा खास प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये निर्मिती सावंत नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, प्रियदर्शनी इंदलकर या कलाकारांसह एक स्किट सादर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा २’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निर्मिती सावंत यांनी हास्यजत्रेत हजेरी लावली होती.
दरम्यान, निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत असलेला ‘झिम्मा २’ चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुचित्रा बांदेकर, रिंकू राजगुरू, सुहास जोशी, शिवानी सुर्वे, सायली संजीव, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.