Nitish Chavan new project: तुम्हाला ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका आठवतेय? या मालिकेतील सूर्या दादा आणि त्याच्या चार बहिणींच्या नात्याने सर्वांची मने जिंकली. बहि‍णींसाठी कायम उभा राहणाऱ्या त्यांच्या सूर्या दादाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

आई लहानपणीच सोडून गेली होती, त्यामुळे वडिलांना दारूचे व्यसन लागले. या सगळ्यात चार लहान बहि‍णींची जबाबदारी सूर्यावर आली. त्यानंतर सूर्याने घराची आणि बहि‍णींची जबाबदारी पार पाडली. तसेच, सूर्या आणि तुळजा यांच्या जोडीलादेखील प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. जवळजवळ एक वर्ष मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.

मालिकेत सूर्या ही प्रुमख भूमिका अभिनेता नितीश चव्हाणने साकारली होती. आता मालिका संपल्यानंतर नितीश चव्हाण कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, अशी उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती.

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेनंतर नितीश चव्हाण ‘या’ प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला

आता नितीश एका गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहिला असे गाण्याचे नाव आहे. सारेगमा मराठीवर हे गाणे पाहायला मिळत आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नितीश चव्हाणचे सादरीकरण लक्ष वेधून घेत आहे. या गाण्यात भक्तीमय वातावरण पाहायला मिळते.

हे गाणे चंदन कांबळे यांनी लिहिले आहे तर रवींद्र खोमणे यांनी गायले आहे; तर चंदन कांबळे यांनी गाण्याला संगीतबद्ध केले आहे. आता या गाण्यावर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

एकाने लिहिले, “रवींद्र भाऊ, गाणे खूप सुंदर आहे. हर हर महादेव”, दुसऱ्या एकाने लिहिले, “खूपच छान”, आणखी एकाने लिहिले, “हे गाणे बघून खूप छान वाटले”, एकाने लिहिले, “नितीश दादा महादेवाच्या पिंडींवरील गाणे पाहिले, खूप सुंदर झाले आहे.” तर अनेकांनी हर हर महादेव अशा कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत.

नितीश चव्हाणला झी मराठी वाहिनीच्या लागिरं झालं जी या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्याने अजिंक्य ही भूमिका साकरली होती. शीतल आणि अजिंक्य ही जोडी प्रचंड गाजली. या जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले.

दरम्यान, आता आगामी काळात अभिनेता कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.