आपल्या सहज सुंदर अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून निवेदिता सराफ यांना ओळखलं जातं. बालवयातच त्यांनी अभिनय क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल ठेवलं. निवेदिता यांनी आजवर असंख्य मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही काम केलेलं आहे. याशिवाय छोट्या पडद्यावर सुद्धा त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. ‘बंधन’, ‘अग्गंबाई सासुबाई’ ते ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत…’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

निवेदिता सराफ यांनी आपलं घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी उत्तमरित्या सांभाळल्या. या प्रवासात पती अशोक सराफ यांचीही त्यांना खंबीर साथ लाभली. याविषयी त्यांनी डॉ मंजिरी पुराणिक यांच्या ‘सर्व काही’ला दिलेल्या पॉडकास्टमध्ये आपलं मत मांडलं आहे.

अशोक सराफ यांच्या एका सल्ल्यानंतर आयुष्य कसं बदललं याविषयी निवेदिता सांगतात, “मला सुरुवातीला माझ्या दिसण्याबाबत भयंकर न्यूनगंड ( Inferiority Complex ) होता. कारण, माझे वडील गजन जोशी फार हँडसम होते. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांचं निधन झालं, ते फार लवकर आम्हाला सोडून गेले. ते फारच छान दिसायचे आणि माझी मोठी बहीण सुद्धा दिसायला खूप छान आहे. त्यात ती शाळेत प्रचंड हुशार होती. सगळेजण मला मिनल जोशीची बहीण म्हणून ओळखायचे. त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं अरे मी छान दिसत नाही. म्हणून मला लूक्सबाबत कॉम्प्लेक्स होता.”

“माझी उंची कमी आहे, मी खूप बारीक आहे…मला असं नेहमी वाटायचं. मी अजिबात छान दिसत नाही. पण, पुढे मला आयुष्यात अशोक सराफ भेटले आणि सगळं काही बदलून गेलं. कारण, त्यांनी मला एका महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव करून दिली. ‘तुम्ही जर छान काम केलंत, तर तुम्ही आपसूकच सुंदर वाटता किंवा सुंदर दिसता.’ लूक्सपेक्षा तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. एखादा सीन छान केला तर तू सुंदरच वाटशील. त्यामुळे आपण स्वत:ला कसं रिप्रेझेंट करतो याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. जर, तुम्हाला स्वत:ला वाटलं की मी सुंदर आहे…तर, आजूबाजूच्या बघणाऱ्यांना सुद्धा वाटतं की, ही सुंदर आहे. त्यामुळे ‘आत्मविश्वास’ महत्त्वाचा ही जाणीव मला अशोक सराफ यांनी करून दिली.” असं निवेदिता सराफ यांनी सांगितलं.

दरम्यान, निवेदिता सराफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर नुकत्याच त्या पती अशोक सराफ यांच्यासह कान्सच्या रेड कार्पेटवर झळकल्या. आता अभिनेत्री लवकरच झी मराठीच्या ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत.