Nivedita Saraf on Girish Oak: निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांनी ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत एकत्र काम केले आहे. आता त्यांनी नुकतीच सुरेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी एकमेकांबरोबर काम करण्याचा अनुभव, मालिकेच्या शूटिंगदरम्यानच्या आठवणी, गमतीजमती, खाण्याचे पदार्थ अशा विविध गोष्टींबद्दल वक्तव्य केले.
“गिरीशचं व्यक्तिमत्त्व हे…”
या मुलाखतीत निवेदिता सराफ यांना विचारले की, डॉक्टर गिरीश ओक यांच्या स्वभावाला साजेसा असा एखादा पदार्थ डेडिकेट करायचा असेल तर तो कोणता असेल? त्यावर निवेदिता सराफ म्हणाल्या, “गिरीशचं व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी आहे. खतखतं ही मिक्स भाजी असते, ज्यामध्ये बऱ्याच भाज्यांचे मिश्रण असतं; ते पौष्टिकही असतं. ही भाजी मी त्याच्यासाठी सांगेन.”
निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या, “गिरीश उत्तम गातो, तसंच तो चांगलं लिहितो. तो अभिनेता तर उत्तम आहेच, त्याचे वाचनही खूप आहे, त्यामुळे त्याचं मराठी चांगलं असल्यामुळे शब्द सुचवू शकतो. त्याची शब्दसंपत्ती चांगली आहे. मला असं वाटतं की, अभिनयाबरोबरच तो बऱ्याच गोष्टी करतो. मला खात्री आहे की त्यानी जर उद्या एखादं दिग्दर्शन करायचं ठरवलं, एखादं नाटक तेही तो उत्तमरीतीने करेल.”
पुढे त्या ‘अग्गंबाई सासूबाई’च्या मालिकेदरम्यानची आठवण सांगत म्हणाल्या, “अग्गंबाई सासूबाई’च्या वेळेस त्याचे एक टॅलेंट माझ्या फार उपयोगी पडलं. ते म्हणजे तो कुठलेही वाहन अप्रतिम चालवतो. त्या मालिकेच्या काही सीनमध्ये मला बाईकवर बसायचं होतं. ते मी खूप वर्षांनी करत होते. आम्ही त्या मालिकेतील गाणं सावंतवाडीला शूट केलं, तर ते घाटातून वगैरे शूट केलं होतं. त्यावेळी मला इतकी भीती वाटली होती, पण हा म्हणाला की तू काही काळजी करू नकोस, मला मामांना तोंड दाखवायचं आहे. आम्ही डबल सीट सायकलवरूनही सीन केला, त्यात मी पुढे बसले होते. माझ्यासाठी तो प्रचंड अवघड सीन होता, पण गिरीशने सांभाळून घेतलं. चांदिवली स्टुडिओमध्ये रात्री अंधारात कमी लाइट्समध्ये आम्ही तो सीन शूट केला होता, प्रोमोच्या वेळेस रिक्षा चालवली होती.”
पुढे गिरीश ओक यांनी उंटावर बसल्याचीही आठवण करून दिली. त्यावर निवेदिता सराफ म्हणाल्या, “साडी नेसून मी उंटावर बसले होते, म्हणून गिरीशच्या या सगळ्या कलागुणांचा ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेच्या वेळी मला फार उपयोग झाला. मी गिरीशला खतखत्याची उपमा यासाठी देते, कारण सगळ्या भाज्यांच्या मिश्रणामुळे ती डिश खूप छान होते आणि चांगली होते. मला वाटतं गिरीशमध्ये हे इतके सगळे गुण आहेत आणि म्हणूनच तो एक उत्तम अभिनेता आहे.”
निवेदिता सराफ यांनी कौतुक केल्यानंतर गिरीश ओक म्हणाले, “माझ्यात गुण असतील, पण ती गुणग्राहक आहे त्यामुळे तिने ओळखलं.”
गिरीश ओक यांना विचारले की, तुम्ही निवेदिता सराफ यांना कोणता पदार्थ डेडिकेट कराल, त्यावर गिरीश ओक म्हणाले की अनारसे. कारण हा पदार्थ फार जणांना येत नाही.
दरम्यान, या मालिकेनंतर गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांनी ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटातही एकत्र काम केले आहे.
