मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. यंदा त्यांना ‘नॅचरल परफॉर्ममर ऑफ द इयर’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी मंचावर तेजश्री प्रधान आणि ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेतील गौरीने त्यांच्यासाठी खास कविता सादर केली. आपल्या सहकलाकारांचं प्रेम पाहून निवेदिता सराफ भारावून गेल्या होत्या. तेजश्री आणि ट्विंकल (गौरी) या दोघींनाही त्या आपल्या मुलीप्रमाणेच जीव लावतात. यानंतर निवेदिता यांच्यासमोर त्यांच्या मुलाचा म्हणजेच अनिकेत सराफचा खास व्हिडीओ प्ले करण्यात आला.
आईने अवॉर्ड जिंकल्यावर अनिकेतचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता. तो आपल्या भावना व्यक्त करत म्हणाला, “हाय मम्मी, माझ्या जन्मापासून माझी पहिली मैत्रीण जी आहे ती माझी आई आहे. ती माझी पहिली टिचर आहे आणि तिच्याकडून मी जे काही शिकलोय, तेच मी दुसऱ्या मुलांना शिकवतोय. आता तिच्याइतकं मला जमणार नाही. पण, मी प्रयत्न करतोय. आईने जशी मला भाषेची गोडी लावली…अगदी तसंच तिने मला वेगवेगळे पदार्थ खायलाही शिकवले. तिच्यासारखं चविष्ट जेवण कुणीच बनवू शकत नाही. तिने जे काही मला शिकवलं…त्यामुळेच मी शेफ होऊ शकलो. तिने प्रत्येकवेळी मला खूप जास्त सपोर्ट केला. माझी खूप इच्छा होती आईला अवॉर्ड मिळत असताना मी तिथे असावं. पण, आता मी ‘सात समंदर पार’ आहे. काही आठवड्यांतच मी तिथे येणार आहे आणि त्यानंतर आम्ही एकत्र खूप वेळ घालवू.”

या गोड Surprise नंतर निवेदिता सराफ यांना अश्रू अनावर झाले होते. त्या म्हणाल्या, “मुलगा माझा खूप दूर असतो. त्यामुळे त्याचा आवाज जरी ऐकला तरी मला भरून येतं. थँक्यू यू सो मच! तुम्ही इतकं सुंदर सरप्राइज मला दिलं. तेजू पहिल्यापासूनच माझी खूप लाडकी, आवडती आहे अगदी माझी मुलगीच आहे आणि आता ‘कृष्णाईच्या लेकी’मुळे मला अजून काही मुलींची आई होता आलं. खूप-खूप थँक्यू!” दरम्यान, सध्या अनिकेत सराफ Oxford मध्ये इंग्रजी शिकवतो असं त्यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.

पुढे, ट्विंकलने तिने स्वत:च्या हाताने बनवून आणलेला शिरा निवेदिता सराफ यांना भरवला. हा संपूर्ण भावनिक क्षण पाहून प्रेक्षकांचे डोळेही पाणावले होते. या सोहळ्याला अशोक सराफ सुद्धा उपस्थित होते. त्यांनीही निवेदिता यांचं भरभरून कौतुक केलं.
