विनोदाचं अचूक टायमिंग साधत गेली अनेक वर्षे अभिनेता ओंकार भोजने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ओंकार भोजनेने सोडला होता. त्याने हास्यजत्रेतून एक्झिट घेतल्यावर सुद्धा सर्वत्र बरीच चर्चा झाली होती. याबाबत अभिनेत्याने ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे.
ओंकार भोजने सांगतो, “तेव्हा माझ्याकडे नुकतेच सिनेमे येऊ लागले होते. त्यामुळे सगळं नियोजन करायला जड जात होतं. आता हास्यजत्रेची टीम खूप मोठी आहे…तेव्हा असं नव्हतं. आता एकमेकांना सहकार्य करून आम्ही बऱ्यापैकी सगळं अॅडजस्ट करतोय. पण, तेव्हा टीम छोटी होती…तर तेव्हा सारखी अॅडजस्टमेंट करणं मला पटत नव्हतं. मी सरांशी सतत बोलायचो की, असं-असं होतंय. यामुळे काय होतं धड एक काम होत नाही. शो संपल्यावर रात्री निघायचं…सिनेमाचं शूटिंग करायचं, परत यायचं. हे मला जमत नाही. म्हणूनच मी सरांना सांगितलं होतं की, सर आता काही दिवस मी थांबतो. अर्थात शो सोडण्याआधी मी चर्चा करूनच निर्णय घेतला होता.”
ओंकार पुढे म्हणाला, “अमित फाळके सर आणि गणेश सरांनी चॅनेलच्या वतीने अगदी पालकांप्रमाणे सर्वांना सांभाळून घेतलंय. ट्रोलिंग वगैरेच्या काळातही ते सतत संपर्कात होते. सिनेमा वगैरे पूर्ण करून तू ये…असं त्यांनी मला आधीच सांगितलं होतं. मग, माझ्या इथल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून मी हास्यजत्रेत पुन्हा एकदा जॉइन झालो. एवढं हे सगळं सरळ-सोपं होतं. उगाच मला काहीतरी वाटलं, म्हणून मी गेलो…मग, सिनेमे केले…सिनेमे वर्क झाले नाहीत म्हणून पुन्हा आलो असं काहीच नाहीये.”
“मी शोसाठी जाणून वेळ काढला कारण, मला कॉमेडीची नवीन पद्धत अशा मोठ्या टीमबरोबर खरंच पडताळून पाहायची होती. आपण नेहमी म्हणतो की, कॉमेडी सिरिअस बिझनेस आहे..म्हणजे नेमकं काय हे मलाही जवळून जाणून घ्यायचं होतं.” असं ओंकार भोजनेने सांगितलं.
दरम्यान, गेल्यावर्षी ऑक्टोबर ( २०२५ ) महिन्यात ओंकार हास्यजत्रेच्या मंचावर पुन्हा एकदा परतला. २०२२ च्या अखेरीस त्याने या शोमधून एक्झिट घेतली होती. हास्यजत्रेचे चाहते आणि ओंकारचे सहकलाकार सुद्धा त्याला प्रचंड मिस करत होते. अखेर त्याच्या कमबॅकनंतर सर्वांनीच आनंद व्यक्त करत पुन्हा एकदा त्याचं जोरदार स्वागत केल्याचं पाहायला मिळालं.
