Sanju Rathod’s Shaky Song : संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाला ‘शेकी’ गाण्याची भुरळ पडली आहे. भाग्यश्री, मृणाल ठाकूर, आएशा खान असे अनेक सेलिब्रिटी गेल्या काही दिवसांत ‘शेकी’ गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळालं. आता या ट्रेंडिंग गाण्यावर मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने जबरदस्त डान्स केला आहे.
‘पारू’ मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री पूर्वा शिंदेने ‘शेकी’ गाण्यावर ‘एक नंबर, तुझी कंबर’ म्हणत भन्नाट डान्स केला आहे. यावेळी पूर्वाने लाल रंगाची सुंदर साडी, त्यावर कमरपट्टा, गळ्यात नेकलेस असा लूक केला होता. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. पूर्वा सध्या ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेत खलनायिका दिशाचं पात्र साकारत आहे.
पूर्वा शिंदे उत्तम नृत्यांगना आहे. सोशल मीडियावरील ट्रेंडिग गाण्यांवरचे डान्स व्हिडीओ अभिनेत्री नेहमीच चाहत्यांबरोबर शेअर करत असते. पूर्वाने ‘पारू’ मालिकेच्या सेटवर नुकताच व्हायरल ‘शेकी’ गाण्यावर ठेका धरला होता. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
अभिनेत्री स्वाती देवल पूर्वाचं कौतुक करत लिहिते, “पू…. गोडुली दिसते आहेस गं राणी” तर, अन्य नेटकऱ्यांनी “आमची फेव्हरेट खलनायिका”, “किती सुंदर डान्स केलाय”, “पूर्वा तू खूपच सुंदर डान्स करते एक नंबर व्हिडीओ”, “मस्तच पूर्वा”, “बेस्ट खलनायिका” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, नुकतीच ‘पारू’ मालिकेत पूर्वाची पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे. मध्यंतरी पारूने दिशाचं सत्य उघडकीस आणल्याने अहिल्याने तिला चांगलीच अद्दल घडवली होती. पण, आता पूर्वा पारितोषशी लग्न करून पुन्हा एकदा किर्लोस्करांच्या घरी आली आहे. आता तिच्या येण्याने किर्लोस्करांच्या घरात काय वादळ येणार? आदित्य आणि पारूच्या नात्यावर याचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित केली जाते.