Paaru Fame Actress : व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेमाचा दिवस. आजच्या खास दिवशी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदारासाठी खास रोमँटिक पोस्ट शेअर केल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय गेल्या काही दिवसांत रेवती लेले, गायत्री दातार, ज्ञानदा रामतीर्थकर अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली सुद्धा दिली आहे. आता या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात एक खास व्यक्ती असल्याचं व्हॅलेंटाईन डेनिमित्त पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

‘राजा राणीची गं जोडी’, ‘मन झालं बाजिंद’, ‘पारू’ यांसारख्या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री श्वेता खरातने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली आहे. श्वेताने तिच्या बॉयफ्रेंडसाठी रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. मात्र, या फोटोंमध्ये तिने बॉयफ्रेंडचा चेहरा रिव्हिल केलेला नाहीये. फक्त त्याचं नाव ‘A’ वरून सुरू होत असल्याचं श्वेताने या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

श्वेता खरात लिहिते, “एक क्षण असा होता…जेव्हा प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटत नव्हत्या. जणू प्रेम सगळ्यांसाठी आहे पण, माझ्यासाठी नाहीये असा माझा समज झाला होता. पण, हळुहळू गोष्टी बदलल्या. माझा देवावर विश्वास होता आणि मग अनपेक्षितपणे माझ्या आयुष्यात तुझी एन्ट्री झाली. तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी Blessing आहेस. तुझ्या प्रेमात मी फुलासारखी फुलत गेले…काही कथा आपण लिहीत नाही तर त्या देवाने आधीच लिहिलेल्या असतात. ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या खूप खूप शुभेच्छा माय डिअर लव्ह! माझ्या आयुष्यात तू नेहमीच खास राहशील. I love you “A”

श्वेताने प्रेमाची कबुली देताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. अनेक मराठी कलाकारांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आता श्वेताचा बॉयफ्रेंड नेमका कोण आहे, ती त्याची ओळख सर्वांना केव्हा करून देणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतुर झाले आहेत.

दरम्यान, श्वेताने ‘पारू’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती. तिचं नाव होतं अनुष्का…तिच्या एन्ट्रीनंतर मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळाला होता. श्वेताच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. मात्र, त्यानंतर कथानकानुसार अनुष्काचा मृत्यू झाल्याने श्वेताची शोमधून एक्झिट झाली होती.