Savalyachi Janu Savali New Entry: काही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरतात. मालिकेत येणारे ट्विस्ट, त्यातील पात्रे, त्यांचे स्वभाव, त्यांच्यात घडणाऱ्या गोष्टी या सगळ्यामुळे प्रेक्षकांची मालिकेतील उत्सुकता वाढते. अशाच मालिकांपैकी एक ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत काय घडलं?

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतात. मालिकेत दाखविल्याप्रमाणे सावली ही गरीब घरातील, सावळ्या रंगाची, गोड आवाज असणारी आणि उत्तम गाणारी मुलगी आहे. तिचे लग्न श्रीमंत घरातील सारंगबरोबर होते, ज्याच्या घरात सावळ्या रंगाचा द्वेष केला जातो. जगन्नाथमुळे हे लग्न होते. सुरुवातीला सगळ्यांप्रमाणेच सारंगदेखील सावलीला चांगले वागवत नसला तरी नंतर तो सावलीच्या प्रेमात पडला.

सावलीवर कोणतेही संकट येण्याआधी तो त्याला सामोरे गेला. सावलीसाठी सगळ्यांच्या विरोधात गेला. सारंग व सावलीच्या जोडीने, त्यांच्यातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावले. पण, आता मात्र सावली व सारंग यांच्यात दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. सावली घर सोडून गेली आहे. राजकुमार, भैरवी, तिलोत्तमा हे सगळेजण त्यांच्यात दुरावा येण्यासाठी कारणीभूत असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री

आता ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. या अभिनेत्रीने याआधीही झी मराठी वाहिनीवर काम केले होते. ही अभिनेत्री नेमकी कोण, हे जाणून घेऊ…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीची झलक पाहायला मिळत आहे. तिच्या हातात चाकू आहे. त्याच्यावर ती तिची बोटे फिरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये पुढे तिचा पूर्ण चेहरा दिसत नसला तरी तिचे डोळे दाखवले आहेत. तसेच ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून पूर्वा शिंदे असल्याचे समजत आहे. व्हिडीओच्या शेवटी ती परत येतेय.. असे लिहिले आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “पुन्हा एकदा नवं वादळ घेऊन ती परत येतेय…”, असे लिहिले आहे.

नेटकरी म्हणाले…

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट करत पूर्वा शिंदेला टॅग करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले, “तुझी एन्ट्री पाहण्यासाठी उत्सुक आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले, “टीआरपी क्वीन परत आली”, आणखी एकाने लिहिले, “खूप उत्सुक आहे”, एकाने लिहिले, “या जयडी, दिशा मॅडम”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

पूर्वा शिंदे ‘पारू’ मालिकेत दिशा या भूमिकेत दिसली होती. तिची मालिकेत जरी नकारात्मक भूमिका असली तरी तिला या भूमिकेतून प्रेक्षकांचे प्रेम मिळाले होते. तसेच ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. आता ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत तिची काय भूमिका असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.