‘पारू’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक ठरू लागली आहे. आता मालिकेत वेगळे वळण आले असून, प्रीतम आणि प्रियाचे नुकतेच लग्न झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या लग्नानंतर घरात गोंधळ घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आता गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान काय घडते, याचा प्रोमो समोर आला आहे.
देवीआईची इच्छा पूर्ण होणार, पारू आणि आदित्य…
‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, प्रीतम आणि प्रिया दोघेही गोंधळाच्या पूजेसाठी बसले आहेत. त्यावेळी प्रियाच्या साडीजवळ आरती असते, ती त्यामुळे भाजणार असते; परंतु तितक्यात पारू आणि आदित्य दोघेही ती आरती बाजूला करण्यासाठी एकदमच जातात. पारू प्रियाला विचारते, “प्रियामॅडम भाजलं नाही ना तुम्हाला?” घाबरलेली प्रिया ‘नाही’ म्हणते. त्यानंतर उरलेलं तेल दिवटीला सर्व वाहून घ्या, असे सांगितले गेल्यानंतर पारू, ‘थांबा, मी देते’, असे म्हणत दिवटीला तेल घालत असतानाच आदित्यदेखील ते तेल घालण्यासाठी गडबडीत हात पुढे करतो आणि पारू व आदित्यकडून दिवटीला तेल घातले जाते. त्यावेळी सावित्री मनातल्या मनात म्हणते, “देवी माऊलीचीच इच्छा होती की, दिवटीला तेल घरातल्या थोरल्या सुनेकडूनच घातलं जावं.”
हा प्रोमो शेअर करताना, “देवीआईची इच्छा पूर्ण होणार, दिवटीला घरातल्या मोठ्या सुनेकडून तेल वाहिलं जाणार…!”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, पारू ही आदित्यच्या घरात नोकर म्हणून काम करते. मात्र ती त्यांच्या बिझनेसची ब्रॅण्ड अॅम्बेसॅडरदेखील आहे. त्यांच्या प्रॉडक्टच्या एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये पारूचे लग्न होत असल्याचा सीन होता. मात्र, वेळेवर तिचा होणारा नवरा न आल्याने आदित्य त्या जाहिरातीच्या शूटिंगमध्ये तिच्या नवऱ्याची भूमिका करतो. त्यावेळी तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. पारू ते सर्व सत्य आहे, असे समजते आणि तेव्हापासून ती आदित्यला तिचा नवरा मानते. दुसरीकडे आदित्य तिला फक्त चांगली मैत्रीण समजतो.
सुरुवातीला प्रीतमचे लग्न दिशाबरोबर ठरलेले असते; मात्र प्रीतमला प्रिया आवडते आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. दिशाचे प्रीतमवर प्रेम नसते; मात्र ती त्याच्या प्रॉपर्टीसाठी प्रीतमबरोबर लग्न करणार असते. प्रियाच्या वडिलांचे मन जिंकण्यासाठी प्रीतम, आदित्य व पारू तिच्या घरी नोकर म्हणून राहतात. मात्र, प्रीतम आणि आदित्य हे अहिल्यादेवी किर्लोस्करची मुलं असल्याचे समजल्यावर ते या लग्नाला नकार देतात. अहिल्यादेवी किर्लोस्कर ही त्यांची बहीण असते आणि काही गैरसमजामुळे ते एकमेकांशी बोलत नसतात. पारू त्यांच्यातील गैरसमज दूर करते. दिशाचा प्रीतमबरोबर लग्न करण्याचा हेतू जेव्हा सर्वांसमोर येतो, त्यावेळी प्रीतम आणि प्रियाचे लग्न लावून दिले जाते.
आता पारू आदित्यची पत्नी होऊ शकणार का? मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे.