Paaru Serial : ‘पारू’ मालिकेत लवकरच सर्वात मोठा ट्विस्ट येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलीच्या म्हणजेच पारूच्या जीवाचं रक्षण करणारा मारुती आता तिच्याच जीवावर उठणार आहे. मालिकेत नेमकं काय घडणार जाणून घेऊयात…
पारूच्या जीवाला धोका असून तिला लवकरच मृत्यूचा सामना करावा लागेल असा इशारा गुरुजी मारुतीला देतात. मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी काहीही करेन असा निर्धार मारुतीने केलेला असतो. पण, वयोमानानुसार पारूला उचलून डोंगर चढणं त्याला शक्य होत नाही आणि मारुतीचं अपूर्ण राहिलेलं व्रत आदित्य पूर्णत्वास नेतो.
आदित्य आणि पारूचं नातं मालिकेत हळुहळू बहरत जात असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या दोघांच्या नात्याची कल्पना अद्याप अहिल्यादेवीला नसते. याशिवाय पारूच्या वडिलांना सुद्धा या दोघांबद्दल काहीच नसतं. पण, आता लवकरच मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. पारूचे वडील मारुती आदित्य अन् पारूला एकमेकांच्या मिठीत पाहतात.
आदित्य-पारूला एकत्र पाहून मारुतीला धक्का बसतो. “ज्या घराला देऊळ मानलं ते माझ्या लेकीच्या एका चुकीमुळे नासणार” असा समज मारुतीचा होतो आणि तो मनात नसूनही भावुक होऊन पारूच्या जेवणात पॉयझन मिसळण्याचा निर्णय घेतो. मारुती जेवणात विष मिसळत असल्याचं पारू दुरुनच पाहते आणि वडिलांनी घेतलेला निर्णय मान्य करते. पारूला अश्रू अनावर होतात पण, वडिलांच्या शब्दाखातर मोठ्या मनाने पॉयझन मिसळलेल्या पदार्थाचं सेवन करते. यानंतर तिची शुद्ध हरपते असं मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
मारुतीने दिलेल्या या सर्वात मोठ्या शिक्षेमुळे ‘पारू’चा जीव वाचणार की ती जगाचा निरोप घेणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. हे भाग ४ आणि ५ जूनला सायंकाळी साडेवाजता प्रसारित केले जातील.

दरम्यान, मालिकेतील हा भयंकर ट्विस्ट पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “काहीपण दाखवतात लिमिट असते”, “आता पारूला कोणत्याही परिस्थितीत जिवंत करू नका”, “अरे बापरे हे सगळं काय सुरूये”, “काहीही फालतूगिरी नका रे दाखवू” अशा कमेंट्स प्रेक्षकांनी या मालिकेच्या प्रोमोवर केल्या आहेत.