Paaru Serial Off Air : ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘पारू’ मालिका १२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. पण, १० फेब्रुवारीनंतर या मालिकेचा एकही एपिसोड ऑन एअर झालेला नाहीये. त्यामुळे मध्यंतरी सर्वत्र ‘पारू’ मालिका अचानक ऑफ एअर झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशा पद्धतीने शेवटच्या भागाची घोषणा न करता कोणतीही मालिका संपली नव्हती, त्यामुळे प्रेक्षकही संभ्रमात पडले होते.

‘पारू’ मालिकेचं नेमकं काय होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला होता. कारण, यामधील कलाकारांनी सुद्धा याबाबत कोणतीच घोषणा केली नव्हती. अखेर ‘पारू’ची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शरयू सोनावणेने याबाबत सविस्तर व्हिडीओ शेअर करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरयूने १० फेब्रुवारीला ‘पारू’चा शेवट झालाय असं सर्वांना सांगितलं आहे.

शरयू सोनावणे म्हणाली, “नमस्कार! मी शरयू सोनावणे म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी पारू… खूप प्रतीक्षेनंतर मी हा व्हिडीओ माझ्या चाहत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी शेअर करतेय. कारणही तसंच आहे. मला गेल्या काही दिवसांपासून अनेक मेसेज, फोन कॉल्स येत आहेत. सगळे मला विचारत आहेत की, ‘पारू’ मालिका अचानक का बंद झाली? तर, मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे की, १० फेब्रुवारी २०२६ रोजी ‘पारू’ मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. सातशे भागांच्या प्रवासात तुम्ही आम्हाला भरपूर साथ दिली, आमच्यावर भरभरून प्रेम केलंत…तुमच्या प्रेमामुळेच आम्ही इतक्या लांबचा पल्ला गाठू शकलो. सतत दोन वर्षे टीआरपी चांगला असूनही ही मालिका अचानक बंद होणं ही सर्वांसाठीच अनपेक्षित गोष्ट आहे आणि अर्थातच धक्कादायक गोष्ट आहे. ‘पारू’ मालिका बंद होतेय याची कल्पना आम्हाला निर्मात्यांकडून दिली गेली नव्हती. आजपर्यंत मराठी इंडस्ट्रीत अशाप्रकारे कुठल्याच मालिकेचा शेवट झालेला नाहीये…जसा ‘पारू’ मालिकेचा शेवट झालाय. यासाठी मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागते की, या मालिकेचा शेवटचा भागही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. काही तांत्रिक अडचणी आणि प्रोडक्शनच्या समस्येमुळे हा शेवटचा भाग प्रसारित झाला नाही.”

“आता ‘पारू’ मालिका बंद होत असली तरीही आपल्यातील नातं..तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम हे कायम माझ्याबरोबर असेल. ‘पारू’च्या सुख-दु:खात तुम्ही माझ्या सोबत होतात यासाठी मी कायम तुमची ऋणी असेन. आता लवकरच भेटुया एका नव्या रुपात…एका नव्या भूमिकेत. तोपर्यंत तुमचे आशीर्वाद आणि तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम हे कायम असूदेत. मी तुमची मनापासून माफी मागते…. तुमचीच पारू!” असं सांगत शरयूने सर्व प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

दरम्यान, शरयूने या व्हिडीओला “निरोप…एका सुंदर प्रवासाचा!” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. आता अभिनेत्री कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे लवकरच स्पष्ट होईल.