Paaru Serial : ‘पारू’ मालिकेने जवळपास २ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘पारू’ मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला. या सिरियलचा शेवटही नीट झाला नाही. याबाबत प्रेक्षकांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. गेल्या दोन वर्षांत ‘पारू’मधील सगळी पात्रं घराघरांत लोकप्रिय झाली. पारूसह आदित्य, अहिल्यादेवी, श्रीकांत, प्रिया या सगळ्या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.

‘पारू’ मालिका संपल्यावर आता आदित्यची भूमिका साकारणारा प्रसाद जवादे ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, हे सर्वांनाच माहीत आहे. पण, या मालिकेत आणखी एक जोडी आहे जी पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून सर्वांच्या भेटीला येतेय. ती जोडी म्हणजे पारूचे ऑनस्क्रीन सासू-सासरे. या भूमिका अनुक्रमे मुग्धा कर्णिक आणि विजय पटवर्धन यांनी साकारल्या आहेत. आता मुग्धा आणि विजय ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

विजय पटवर्धन यांनी पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितलं आहे. अभिनेते म्हणाले, “नमस्कार मंडळी, ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील पात्रं जणूकाही तुमच्या घरातलीच जिवाभावाची माणसं झाली होती. या पात्रांचं सुख-दुःख तुम्ही जवळून पाहिलं. अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर या आदित्यच्या आई वडिलांना आणि ‘पारू’च्या सासू-सासऱ्यांवर तुम्ही भरभरुन प्रेम केलंत, आशीर्वाद दिलेत. दुर्दैवाने ही मालिका संपली. कशी? का? कारणं काय? याच्याकडे थोडं दुर्लक्ष करुयात. जे होतं ते चांगल्यासाठी म्हणूयात आणि सर्वांचं सगळं चांगलं होऊ द्या अशी प्रार्थना करून नव्याने सुरुवात करुयात. कारण, अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर येत आहेत नव्या रूपात पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला…”

Award Banner

“अहिल्या आणि श्रीकांत आता ‘आशालता अनंत जोशी’ आणि ‘अनंत माधव जोशी’ उर्फ ‘धुरंधर’बनून तुमच्या भेटीला आले आहेत. हे दोघं गेले आहेत त्यांच्या मुलीबरोबर ट्विंकलबरोबर, परदेशात सुट्टी एन्जॉय करायला. ते कुठल्या देशात गेले आहेत? तिथे त्यांना कोणती माणसं भेटतात? ही सुट्टी ते कशी एन्जॉय करतात? हे पाहायला मिळणार आहे, सवाई गंधर्व निर्मित, अभिजात प्रकाशित, भरत दाभोळकर लिखित आणि दिग्दर्शित, “कॅरी ऑन स्पायगिरी” या घराच्या दिवाणखान्याच्या चौकटीतून बाहेर आलेल्या जबरदस्त नाटकात. तर भेटूया नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला.”

दरम्यान, या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १० एप्रिलला शिवाजी मंदिर दादर येथे पार पडणार आहे. यानंतर १८ तारखेला या नाटकाचा प्रयोग पुण्यात पार पडणार आहे. दरम्यान, ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ या नाटकासाठी मुग्धा कर्णिक आणि विजय पटवर्धन यांना चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.