‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला. १० फेब्रुवारीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला यानंतर ‘पारू’चा एकही एपिसोड ऑन एअर झालेला नाहीये. त्यामुळे सगळ्याच प्रेक्षकांना धक्का बसला होता. या मालिकेबरोबर नेमकं काय झालं, अशी अचानक का संपली? याबाबत प्रेक्षकांच्या मनातही संभ्रम निर्माण झाला होता. अखेर ‘पारू’ची मुख्य भूमिका साकारणाऱ्या शरयू सोनावणेने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत मालिका संपल्याचं जाहीर केलं आहे. तसेच मध्येच मालिका संपल्यामुळे सगळ्या प्रेक्षकांची माफी सुद्धा मागितली.
यानंतर आता ‘पारू’मध्ये दामिनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री श्रुतकिर्ती सावंतने पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या मालिकेने भरभरून दिलं. पण, शेवट अतिशय वाईट झाला असं श्रुतकिर्तीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
श्रुतकिर्ती सावंत पोस्ट शेअर करत लिहिते, “दा..मि…नी! दामिनी हे नाव माझ्या आयुष्यातून इतक्या सहजासहजी निघून जाणं मला पटण्यासारखं नाहीये आणि कदाचित तुम्हालाही… पण, मालिका निरोप घेतेय… हा निरोप आमच्यापर्यंत इतक्या अव्यवस्थितपणे आला की, तुम्हाला सांगणं मला उचित वाटत नव्हतं. आज मालिका संपून जवळजवळ एक महिना झाला. पण, दामिनी किर्लोस्कर हे नाव माझ्या कानात अजूनही तसंच घुमतंय. मला अजूनही दामिनी हे नाव ऐकल्यानंतर कुठेतरी असं वाटतंय की आपल्याला कोणीतरी बोलवतंय. पण हा शेवट अतिशय वाईट होता. मी समजू शकते तुम्हाला ही मालिका प्रचंड आवडायची आणि मलासुद्धा ‘पारू’ या मालिकेने भरभरून दिलं. म्हणजे जवळजवळ ‘झी मराठी’चं पहिलं अवॉर्ड हे या मालिकेमुळेच मला मिळालं. त्याचबरोबर मला उत्कृष्ट असे दिग्दर्शक, उत्कृष्ट DOP, जवळचे मित्र हे याच मालिकेमुळे भेटले.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “आता ही मालिका निरोप घेत आहे पण, तुम्ही अजिबात हताश होऊ नका. मी लवकरच तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येईन. एका नव्या अंदाजात आणि एका नव्या ऊर्जेने… तोपर्यंत सोबत राहा. ‘पारू’चा हा असा शेवट होणं, हे मलाही पटत नाहीये पण काही आर्थिक समस्या निर्माण झाल्यामुळे अचानक या मालिकेला निरोप घ्यावा लागला आणि आम्हीही खूप आर्थिक संकटात अडकलो आहोत. त्याच्यावर काय उपाय काढता येईल तेही आमचं बोलणं सुरूच आहे पण तुमची सोबत हवी आहे.”
“चला… Thank You So Much! मनापासून मी माझ्या सर्व प्रेक्षकांचे, विशेषतः ‘झी मराठी’च्या प्रेक्षकांचे, मनःपूर्वक आभार मानते. दामिनी हे माझं जीवापाड आवडतं पात्रं आहे आणि मी मन लावून ही व्यक्तिरेखा साकारली. या भूमिकेने मला तुमच्या प्रेमाचं, पाठिंब्याचं आणि अविश्वसनीय भावनिक बंधनाचं दर्शन घडवलं. प्रत्येक सीन, प्रत्येक भाव…तुम्ही समजून घेतलेत, मला स्वीकारलं. तुम्ही प्रेक्षकांनी मला जे प्रेम दिलंत, जे मी कधीही विसरू शकणार नाही. जरी ही मालिका संपली असली, तरी “दामिनी” हे नाव माझ्या हृदयात कायम राहणार आहे. मी कलाकार म्हणून, अजून काही खास गोष्टी घेऊन, एका नवीन ऊर्जेने, पुन्हा येईन. तुम्ही माझ्याबरोबर आहात हा माझा विश्वास आहे आणि मी पुन्हा तुमच्यासमोर एक सुंदर कलात्मक प्रवास घेऊन येईन. तोपर्यंत रजा घेते…! LoveLove” असं श्रुतकिर्तीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
