स्वतःची एक अशी वेगळी राजकीय विचारधारा असूनसुद्धा या संपूर्ण चित्रपटसृष्टीत थाटात काम करणारे काही मोजके अभिनेते आहेत त्यापैकीच एक म्हणजे परेश रावल. मुंबईत एका गुजराती कुटुंबात जन्मलेल्या परेश यांना लहानपणापासूनच नाटकाची आवड होती. १९७४ मध्ये कॉलेजचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली.नाटकात तर त्यांनी नाव कामावलंच पण मोठ्या पडद्यावर झळकणं हे त्यांच्या नशिबातच होतं. चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाल्यानंतरही परेश रावल यांचं नाटकावरील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. आजही त्यांना कोणत्याही मुलाखतीमध्ये जेव्हा नाटकाबद्दल किंवा रंगभूमीबद्दल विचारणा होटे तेव्हा ते त्याबद्दल भरभरून बोलतात. आणखी वाचा : 'TDM' ला अजूनही प्राईम टाईम शो नाही; रोहित पवार यांची चित्रपटाच्या समर्थनार्थ पोस्ट चर्चेत नुकतंच परेश रावल यांनी 'कोण होणार करोडपती' या मराठी रीयालिटि शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासह नाटकाची सेंचुरी पार करणारे मराठी दिग्दर्शक विजय केंकरेसुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि कार्यक्रमातील प्रश्नांची उत्तरंही दिली. याच कार्यक्रमात परेश रावल यांनी मराठी रंगभूमीचं कौतुक केलं. ते म्हणाले, "मराठी रंगभूमी ही सतत काही ना काहीतरी नवीन देत आली आहे. काहीतरी नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार नाटकं मराठीत पाहायला मिळतात. शिवाय मराठी नाटकांचा जो दर्जा असतो त्यातून बरंच काही शिकण्यासारखं मिळतं." परेश रावल आणि विजय केंकरे यांचा हा विशेष भाग सोनी मराठी चॅनलवर आज रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.