मालिका हे अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं महत्त्वाचं माध्यम बनलं आहे. ओटीटीच्या काळातही मालिकांची क्रेझ कायम आहे. मराठी मालिकांचाही मोठा चाहतावर्ग आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हते तर जगभरातील विविध ठिकानाहून मालिका पाहिल्या जातात. अशातच आता ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘पारू’चाही परदेशात चाहतावर्ग असून जागतिक स्तरावर ही मालिका पाहिली जात आहे.

‘पारू’ मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारलेली अभिनेत्री शरयू सोनावणे परदेशात गेली असून या मालिकेचा दक्षिण आफ्रिकेत गौरव होत आहे. ही मालिका तिकडच्या भाषेत डब केली जात असून तेथील प्रेक्षकांना ‘पारू’ पसंत पडत आहे. नुकतंच शरयू सोनावणेने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर करत ही अभिमानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे.

परदेशात पारूचा गौरव

शरयूने इन्स्टाग्रामवर परदेशात जातानाचा विमानतळावरील व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये ती तिच्या नवऱ्याबरोबर दक्षिण आफ्रिकेसाठी निघाली असल्याचं दिसतं. समोर आलेल्या या व्हिडीओला खास कॅप्शनसुद्धा देण्यात आली आहे. Z Zonke वाहिनीने सोशल मीडिया पेजवरुन झी वाहिनीवरील सर्व कलाकार दक्षिण आफ्रिकेत एकत्र येणार असल्याची माहिती दिली आहे. या कार्यक्रमात शरयू देखील सहभागी होणार आहे. ‘पारू’ मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. लोकप्रिय कलाकारांनी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या. महाराष्ट्रात मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जागतिक स्तरावरही मालिकेला पसंती मिळत आहे. Z Zonke या वाहिनीवर ही मालिका तेथील स्थानिक भाषेत डब केली जातेय. त्यामुळे फेब्रुवारी २०२६मध्ये जरी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेची क्रेझ कायम आहे.

शरयूने या मालिकेत पारू ही भूमिका साकारलेली. तिच्याबरोबर या मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकलेला. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडलेली. पारू, आदित्य आणि मुग्धा कर्णिक यांनी साकारलेली अहिल्यादेवींची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. मराठी मालिकाविश्वातील अनेक मालिका भारताबाहेरही मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात. अनेकदा कलाकार त्यांना परदेशातील चाहत्यांनी केलेल्या मॅसेजचे, प्रतिसादाचे कस्से सांगत असतात.

दरम्यान, शरयू सोनावणेने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये मुख्य नायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. तिने आतापर्यंत ‘झी युवा’वरील ‘प्रेम पॉयजन पंगा’, ‘स्टार प्रवाह’वरील ‘पिंकीचा विजय असो’, ‘झी मराठी’वरील ‘पारू’ यांसारख्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंनज केलं आणि इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.